मुंबई, 26 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने केलेल्या कारवाईबद्दल शिवसेनेनं वायुसेनेचं कौतुक केलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘आपण घरात घुसून मारलं आहे. आपल्या सेनेचा खूप अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 56 इंचाची छाती दाखवून दिली आहे,’ अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यासोबत पाकिस्तानी सैन्याचे 5 सैनिकही ठार करण्यात आल्याची माहिती आहे. तर काहीजण जखमी झाले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवायला सुरूवात केली आहे. अखेर भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर 1000 किलोचा बॉम्ब फेकला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे. एएनआयनं याबद्दलची माहिती दिली आहे. मिराज विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली आहे. भारतीय लढाऊ विमानांनी LoC पार करून पाकव्याप्त काश्मिरात प्रवेश केला आहे. भारताकडून ‘जैश- ए- मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत अद्याप भारतीय वायूसेनेकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र लवकरच वायूसेनेकडून याबाबत माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे. सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताकडून दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याचा विचार सुरू होता. त्याचाच एक भाग म्हणून भारताकडून हा हल्ला करण्यात आल्याचं बोललं जात आहे. पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर 14 फेब्रुवारीला हल्ला झाला होता. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं केलेल्या या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. IndiaStrikeBack : परराष्ट्र सचिवांची UNCUT पत्रकार परीषद