भारतीय महिला शिक्षणतज्ज्ञाशी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केलं लज्जास्पद वर्तन; जाणून घ्या सविस्तर प्रकरण
नवी दिल्ली, 13 जानेवारी : महिला आणि मुलींशी गैरवर्तन होत असल्याच्या घटना सतत आपल्या कानावर पडत असतात. सार्वजनिक ठिकाणं, कामाच्या कार्यालयांपासून ते अगदी स्वत:च्या घरातदेखील महिला सुरक्षित नसल्याचं वेळोवेळी सिद्ध झालं आहे. अश्लील भाषा किंवा मीडिया फाईल्स वापरून ऑनलाईन पद्धतीनंसुद्धा महिलांचा छळ केला जातो. पंजाबमधील एका महिला शिक्षणतज्ज्ञाला असाच अनुभव आला आहे. दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी असभ्य वर्तन आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. महिला शिक्षणतज्ज्ञानं पाकिस्तानला जाण्यासाठी व्हिसासाठी अर्ज केला होता. या संदर्भात ती पाकिस्तानी उच्चायुक्तालयात गेली होती. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण 2021मध्ये घडलं होतं. एका विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक आणि विभाग प्रमुख असलेल्या महिलेनं पाकिस्तानला भेट देण्यासाठी ऑनलाइन व्हिसासाठी अर्ज केला होता. त्यानंतर दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांनी या महिलेला लाहोरला भेट देण्याच्या उद्देशाबद्दल अनेक प्रश्न विचारले होते. या महिलेनं पाकिस्तानी अधिकाऱ्यांना सांगितलं, “मला लाहोरला जाऊन स्मारकांचे फोटो काढायचे आहेत आणि त्याबद्दल लेख लिहायचे आहेत. तेथील एका विद्यापीठाला भेट द्यायची आहे. कारण, तिथे मला व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.”
हे ही वाचा : भारतात रशियन नागरिकांचे सिरीयल किलींग; थेट पुतीन यांच्यासोबत जोडला जातोय संबंध
प्राध्यापिकेचा आरोप आहे की, यादरम्यान आणखी एका कर्मचाऱ्यानं तिला वैयक्तिक प्रश्न विचारले ज्यामुळे ती अस्वस्थ झाली. महिला प्राध्यापक म्हणाली, “मी लग्न का नाही केलं? मी लग्नाशिवाय कसं जगते? माझ्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी मी काय करते? असे प्रश्न मला विचारण्यात आले.” ती खलिस्तानचे समर्थन करते का, असंही विचारण्यात आलं होतं असं या प्राध्यापिकेनं सांगितलं.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडे मागितली मदत
प्राध्यापिकेचं म्हणणं आहे की, तिने प्रश्नांची उत्तरं देणं टाळण्याचे अनेक प्रयत्न केले. तरीही सातत्यानं असे प्रश्न विचारले गेले. शेवटी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे. यासोबतच पोर्टलच्या माध्यमातून पाकिस्तान सरकारकडेदेखील तक्रार केली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनाही पत्र लिहिलं आहे. पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यासोबत झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉटही या प्राध्यापिकेनं परराष्ट्रमंत्र्यांना पाठवले आहेत.
हे ही वाचा : ‘प्रेयसीचं भूत मला सतावतं..’; घाबरलेल्या प्रियकराची पोलिसांसमोर कबुली अन् अखेर 8 महिन्यांनी त्या हत्येचा उलगडा
याशिवाय, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी तिला भारत सरकारच्या विरोधात लिहिण्यास सांगितलं होतं. त्याचा चांगला मोबदला देण्याचं आश्वासनही दिलं होतं. मात्र, या महिलेनं तसं करण्यास नकार दिला.
दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
या प्राध्यापिकेचं म्हणणे आहे की, तिच्या तक्रारीकडे कोणीही लक्ष दिलं नाही. इतर भारतीय महिलांनीदेखील पाक उच्चायुक्तालयात जाऊन हे अधिकारी कसे वागतात हे जाणून घ्यावं. दोन्ही कर्मचार्यांना त्यांच्या गैरवर्तनासाठी पाकिस्तानात परत पाठवलं पाहिजे, अशी या प्राध्यापिकेची मागणी आहे.