नवी दिल्ली, 3 जुलै : कोरोना (Coronavirus Pandemic) संकटाच्या काळातही कुरापात काढण्याची चीनची (India China tension) खुमखुमी कमी झालेली नाही. पूर्व लडाखमधील (East Ladakh border) नियंत्रण रेषेवरून (LAC) भारत आणि चीन मध्ये निर्माण झालेला वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच चीननं पुन्हा पूर्व लडाखच्या सीमा रेषेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं आहे. हजारोंच्या संख्येनं चिनी सैनिक भारत सीमेवर जमले असल्याची वार्ता कळताच भारतानेही सावध पवित्रा घेतला आहे. चीनच्या या हालचालीची गांभीर्यानं दखल घेत भारतानं ही 50 हजार सैनिकांना या भागात तैनात केलं आहे. यामुळं दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला असून, सीमेवर युद्धाचे ढग गोळा होऊ लागले आहेत. वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी गलवान खोऱ्यात (Galwan Valley) झालेल्या हिंसाचारानंतर चीननं तिथं जितके सैनिक तैनात केले होते, त्यापेक्षा 15 हजार अधिक सैनिक आता तिथं पाठवले आहेत. गेल्या काही महिन्यांत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीनं (PLA) भारताशी चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाही या भागात 50 हजारांपेक्षा अधिक सैनिक तैनात केले आहेत. चीनच्या या हालचाली भारतासाठी चिंताजनक आहेत. हा सीमा प्रश्न सोडवण्याच्याबाबतीत चीनच्या हेतू विषयीही यामुळे शंका निर्माण होत आहे. अर्थात, चीनच्या कारवाया हाणून पाडण्यासाठी भारतही सज्ज असून, सीमा रेषेसह लडाखमध्येही भारतानं अतिरिक्त स्ट्राइक कॉर्प्स तैनात केले आहेत. मथुराच्या वन स्ट्राईक कॉर्प्सला लडाखमधील उत्तर सीमेवर पाठविण्यात आलं असून, 17 माउंटन स्ट्राइक कॉर्प्सला अतिरिक्त दहा हजार सैनिकांची कुमक पाठवण्यात आली आहे. संपूर्ण उत्तर-पूर्व राज्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भारतीय वायुसेनाही सज्ज झाली असून, राफेलसह मिग -29, सुखोई-30 विमानांची तुकडी उत्तर सीमा भागात तैनात करण्यात आली आहे. हिंदी महासागरात भारत-अमेरिकी नौदलाच्या एकत्र युद्धाभ्यासाचे फोटो टी -90 भीष्म, पिनाका रॉकेट, अपाचे, चिनूक आदी लढाऊ विमानंही सीमेवर सज्ज ठेवण्यात आली आहेत. भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवर प्रथमच के-9 तोफाही तैनात केल्या असून, एम -777 तोफखाना सज्ज झाला आहे. भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला सीमा रेषेबाबतचा वाद सोडवण्यासाठी दोन्ही देश राजकीय आणि सैन्य पातळीवर चर्चा करीत आहेत. 25 जून रोजी या चर्चेची आणखी एक फेरी पार पडली आणि यावेळी त्यांनी पूर्व लडाखमधील संघर्षाच्या ठिकाणांवरून सैन्य मागं घेण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शक्य तितक्या लवकर सैन्याच्या चर्चेच्या पुढील फेऱ्या घेण्याचा निर्णय घेतला होता. गलवान चकमकीला एक वर्ष पूर्ण; वर्षभरात चीनशी दोन हात करण्यास भारत हरप्रकारे सज्ज मागील वर्षी मेपासून पूर्व लडाखमधील अनेक ठिकाणी भारत आणि चीनच्या सैन्यात संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांनी चर्चेनंतर फेब्रुवारी महिन्यात पॅगॉंग लेकच्या उत्तर आणि दक्षिणेकडील काठावरुन सैन्य पूर्णपणे मागे घेतलं. उर्वरित ठिकाणांवरून सैन्य मागं घेण्याची चर्चा सुरू आहे. हॉट स्प्रिंग्ज, गोगरा आणि डेप्सांग इथून चीननं आपलं सैन्य मागं घ्यावं यावर भारत जोर देत आहे. एप्रिल 2020 मध्ये इथं जशी स्थिती होती तशीच निर्माण करण्याचा भारताचा आग्रह आहे.