मुंबई, 26 ऑक्टोबर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची थेट भूमिका नेहमीच कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही भावते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं. या इमारतीचं उद्घाटन करताना गडकरींचा पारा चढला होता. काही 200 ते 250 कोटींच्या या कामासाठी तब्बल 9 वर्षांचा अवधी लागल्यामुळे त्यांनी राग व्यक्त केला. या वर्च्युअल कार्यक्रमादरम्यान त्यांनी काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच झडती घेतली. उद्घाटनाच्या सुरुवातीलाच गडकरी म्हणाले की, सर्वसाधारणपणे उद्घाटनाच्या कार्यक्रमांमध्ये अशी प्रथा असते की काम पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन केलं जावं. मात्र मला तुमचं अभिनंदन करायचा संकोच वाटतो. 2008 मध्ये हे काम निश्चित झालं होतं. 2011 मध्ये त्याचा निविदाही निघाला..मात्र 200 ते 250 कोटींचं हे काम पूर्ण होण्यासाठी 9 वर्षांचा काळ जावा लागला, ही खेदाची बाब आहे. या इमारतीचं काम पूर्ण होण्यासाठी तीन सरकारं आणि 8 अध्यक्ष होऊन गेले. ज्या महान लोकांनी 2011 पासून 2020 पर्यंत हे काम केलं त्यांचे फोटो या कार्यालयात लावायला हवा, म्हणजे त्यांचा इतिहास लक्षात राहिल, अशा शब्दात त्यांनी टोला लगावला.
हे ही वाचा- हा नवीन भारत आहे! घरात घुसूनच नाही तर बाहेरही लढू; डोभालांचा चीन-पाकला इशारा दिल्ली-मुंबई महामार्ग हा 80 लाख ते 1 लाख कोटी रुपयांच काम साडे तीन वर्षात पूर्ण झालं. मात्र या अडीचशे कोटींच्या कामासाठी 10 वर्षे लागतील हे अभिनंदन करण्यासारखं काम नाही. खरं तर मला हे सांगायची लाच वाटते. ज्या अधिकाऱ्यांनी निर्णय न घेता केवळ समस्या निर्माण केल्या, हे 12 ते 13 वर्षांपासून चिकटून बसले आहेत. हे अत्यंत नकारात्मक व विकृत आहे. अशा लोकांना मार्गदर्शक म्हणून का स्वीकारलं जातं हे मला कळत नाही. असं म्हणत त्यांनी त्या अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. पुढे गडकरी म्हणाले, माझं नाव तर बदनाम झालंच आहे. मात्र अशा कामचुकार अधिकाऱ्यांना हाकलून देणं आवश्यक आहे. मला मंत्र्यांचे अधिकार माहीत आहेत. तसा माझा स्वभाव संवेदनशील आहे. मला कोणाचं नुकसान करायचं नाही. मात्र अशा अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करणं गरजेचच आहे. एका इमारतीच्या कामाला यांना 9 वर्षांचा अवधी लागतो…अशांना बाहेरचा रस्ता दाखवायला हवा.