JOIN US
मराठी बातम्या / देश / 2024 च्या आधीच काँग्रेस पुन्हा उभी राहणार? प्रशांत किशोर यांचा मास्टर प्लान आला समोर

2024 च्या आधीच काँग्रेस पुन्हा उभी राहणार? प्रशांत किशोर यांचा मास्टर प्लान आला समोर

प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेत्यांना विविध गोष्टींची जाणीव करून दिली आहे. काँग्रेसची स्पर्धा मोदी-शहा जोडीशी आहे. मोदींची सध्याची लोकप्रियता पाहता त्यांना पराभूत करण्यास फार कष्ट करावे लागतील, ही बाजूदेखील पीके यांनी मांडली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 एप्रिल : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वांत जास्त काळ सत्तेवर असलेला पक्ष अशी काँग्रेसची (Congress) ओळख आहे; मात्र 2014पासून काँग्रेसनं विविध राज्यांतल्या विधानसभा निवडणुका आणि सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ला आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) या भाजप (BJP) जोडगोळीच्या नियोजनापुढे काँग्रेसमधल्या अनेक दिग्गज नेत्यांनीही माना टाकल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता राजकीय रणनीतिकार (Political Strategist) प्रशांत किशोर (Prashant Kishor) अर्थात पीके यांना मदतीसाठी पाचारण करण्यात आलं आहे. त्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून काँग्रेस पक्षामध्ये जोरदार मंथन सुरू आहे. पीके गेल्या चार दिवसांपासून सातत्यानं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेत आहेत. गांधी कुटुंबानं पीके यांना काँग्रेसमध्ये येण्यासाठी मार्ग मोकळा केल्याचं म्हटलं जातं आहे; मात्र त्यापूर्वी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांची मतंही विचारात घेतल्याचं बोललं जात आहे. यामध्ये पी. चिदंबरम, जयराम रमेश, के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, अंबिका सोनी, रणदीप सुरजेवाला, ए. के. अँटनी, वीरप्पा मोईली, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल या नेत्यांचा समावेश आहे. वीरप्पा मोईली यांनी तर प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये घेण्यास उघडपणे पाठिंबा दिला आहे. या सर्व नेत्यांसमोर प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचं पुनरुज्जीवन करण्याची योजना तयार केल्याचं मानलं जात आहे. ‘एनडीटीव्ही’ने, तसंच ‘प्रभात खबर’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेत्यांना विविध गोष्टींची जाणीव करून दिली आहे. काँग्रेसची स्पर्धा मोदी-शहा जोडीशी आहे. मोदींची सध्याची लोकप्रियता पाहता त्यांना पराभूत करण्यास फार कष्ट करावे लागतील, ही बाजूदेखील पीके यांनी मांडली आहे. भाजपच्या यशात हिंदुत्व, तीव्र राष्ट्रवाद (Intense Nationalism), तसंच मोफत रेशन, घर आणि शौचालय यांसारख्या कल्याणकारी योजनांचा मोठा हात आहे, हे नाकारता येणार नाही, असं पीके यांचं मत आहे. याशिवाय भाजपनं वेळोवेळी केलेली अध्यक्षांची निवड हादेखील मोठा फॅक्टर ठरला आहे. स्वातंत्र्यासाठी लढणारा काँग्रेससारखा पक्ष हळूहळू आपले आदर्श विसरला, असंही पीके यांचं मत आहे. भाजपनं काँग्रेसचे अनेक नेते फोडले आणि अनेक माजी नेत्यांच्या कामाचं श्रेय लुटलं. याउलट काँग्रेसला तर जवाहरलाल नेहरूंच्या (Jawaharlal Nehru) बाजूनेही कधी म्हणावं तितकं बोलता आलं नाही, असं म्हटलं जातं. याच कट्टर राष्ट्रवादाला आपली ढाल बनवण्यास पीके काँग्रेसला सांगू शकतात, असं सांगितलं जात आहे. प्रशांत किशोर यांच्या मते, काँग्रेस चालवण्याची आणि पंतप्रधानपदाची जबाबदारी दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडे दिली पाहिजे. म्हणजेच गांधी घराण्यातली एक व्यक्ती या दोन्ही पदांवर नसावी. याशिवाय, सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे काँग्रेसकडे 4.5 कोटी सदस्य आहेत. त्यापैकी 1.25 कोटी डिजिटली पक्षासोबत जोडलेले आहेत. ज्या काँग्रेसला 138 वर्षांचा इतिहास आहे, ज्या पक्षानं 50 वर्षांहून अधिक काळ देशावर राज्य केलेलं आहे, त्याची अवस्था आज अशी का झाली आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं काम पीके करणार आहेत. असं म्हटलं जातं आहे की, प्रशांत किशोर यांनी परिस्थितीचा सारासार विचार करून फोर एमचा आग्रह धरला आहे. मेसेज, मेसेंजर, मिशनरी आणि मेकॅनिक्स या चार घटकांचा त्यामध्ये समावेश होतो. म्हणजेच एखादा ठराविक संदेश कोणती व्यक्ती कोणत्या मार्गानं लोकांपर्यंत पोहोचवणार यावर काम केलं जाणार आहे. या प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या डेटाचा पक्षाला जास्तीत जास्त कसा फायदा होईल, याची तजवीज पीके करणार आहेत. काँग्रेसनं हिंदू धर्म आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यामध्ये सहभाग न घेता फक्त तीव्र राष्ट्रवादाचा पुरस्कार केला पाहिजे. यासाठी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या तिरंगा यात्रेसारख्या अभियानांचा आधार घ्यावा लागला तरी चालेल, असा सल्ला काँग्रेस नेत्यांना पीके यांच्याकडून मिळाल्याचं म्हटलं जात आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशासारख्या काही राज्यांमध्ये काँग्रेसनं आपल्या रणनीतीत सुधारणा करावी आणि या राज्यांमध्ये युती टाळावी. काँग्रेसने लोकसभेच्या सुमारे 370 जागांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि महाराष्ट्र, पश्चिम बंगाल व तामिळनाडूमध्ये युती करून निवडणूक रिंगणात उतरलं पाहिजे, असं प्रशांत किशोर यांनी सुचविल्याचं सूत्रांनी सांगितलं. हे ही वाचा- WHO प्रमुखांचं ‘केम छो’ ऐकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना करून टाकलं ‘तुलसीभाई’, पाहा VIDEO प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींसोबत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 2014 मध्ये त्यांनी नरेंद्र मोदींच्या टीममध्ये जाऊन त्यांना यश मिळवून दिलं. त्यानंतर लालू आणि नितीश कुमार यांना एका मंचावर आणण्याची किमया केली. कॅप्टन अमरिंदर सिंग, जगनमोहन रेड्डी, एम. के. स्टॅलिन यांना सत्ता मिळवून दिली. ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा बंगालमध्ये निवडून येण्यास मदत केली. त्यांची कामगिरी पाहता सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते प्रशांत किशोर यांना विरोध करणं अशक्यच होतं. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांच्या मते, प्रशांत किशोर यांनी दिलेल्या सल्ल्यांनुसार संघटना अधिक प्रभावी होण्यासाठी बघेल यांनाही बैठकांमध्ये सामील करून घेण्यात आलं आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेली सल्लामसलत येत्या 24 ते 48 तासांत पूर्ण होईल, अशी आशा सुरजेवाला यांनी व्यक्त केली आहे. पीके यांचा प्लॅन काँग्रेसला 2024च्या निवडणुकीमध्ये यश मिळवून देईल की नाही, हे येणारा काळच सांगू शकेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या