नवी दिल्ली, 22 जुलै : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना (Shisena) अडचणीत सापडली आहे. आधी शिंदेंसोबत शिवसेनेचे 55 पैकी 40 आमदार गेले, त्यामुळे राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेचे 19 पैकी 12 खासदारही शिंदे गटात गेले. यामध्ये नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचाही समावेश आहे. हेमंत गोडसे हे 2014 साली पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले, पण लोकसभेमध्ये जाताच त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. देशाच्या संसदेमध्ये 1956 सालापासून गोडसे हा शब्द असंसदीय म्हणून गणला जातो. संसदेमध्ये हा शब्द वापरण्यावर बंदी घालण्यात आली, तसंच हा शब्द वापरण्यात आला तर तो कामकाजातून वगळला जायचा. 30 जानेवारी 1948 साली नथुराम गोडसेने (Nathuram Godse) महात्मा गांधींची हत्या केली, यानंतर गोडसे शब्दावर संसदेत बंदी घालण्यात आली. गोडसे शब्दावर असलेली ही बंदी उठवावी यासाठी त्यांनी दोन्ही सदनांच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिली. एखाद्या खासदाराचं आडनाव असंसदीय शब्द कसा असू शकतं? माझं आडनाव गोडसे आहे यात माझी काहीही चूक नाही. तसंच मी माझं आडनावही बदलणार नाही, असं हेमंत गोडसे त्या पत्रात म्हणाले. हेमंत गोडसे यांच्या या पत्राची दखल घेण्यात आली. संसदेमध्ये गोडसे हा शब्द फक्त नथुराम गोडसेबद्दल वापरला गेला तर असंसदीय असेल, असं तेव्हाच्या लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केलं, ज्यामुळे हेमंत गोडसे यांना दिलासा मिळाला.