ओडिशा, 22 जानेवारी: केंद्रीय मंत्री विश्वेश्वर तुडू Union Minister Bishweswar Tudu) यांच्यावर ओडिशाच्या दोन सरकारी (Odisha government officials) अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे की, शुक्रवारी मोदी सरकारच्या एका मंत्र्याने भाजपच्या जिल्हा कार्यालयात (BJP’s district office) त्यांना मारहाण केली, ज्यात ते जखमी झाले. याप्रकरणी केंद्रीय मंत्र्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. मात्र, केंद्रीय मंत्र्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. यावर संतापले केंद्रीय मंत्री ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, विश्वेश्वर तुडू (Bishweswar Tudu) हे केंद्रीय जलशक्ती आणि आदिवासी व्यवहार राज्यमंत्री आहेत. मंत्र्यांनी जिल्हा नियोजन मंडळाचे उपसंचालक अश्विनी मलिक आणि सहायक संचालक देबाशीष महापात्रा यांना मयूरभंज जिल्ह्यातील बारीपाडा येथील पक्ष कार्यालयात आढावा बैठकीसाठी बोलावले होते. हे दोन्ही अधिकारी सरकारी फाईल घेऊन येथे आले नाहीत, त्यामुळे केंद्रीय मंत्री संतप्त झाल्याचे बोलले जात आहे. त्यांनी याला प्रोटोकॉलचे उल्लंघन म्हटलं आहे. ‘समजावलं, पण ऐकलं नाही’ देबाशीष महापात्रा म्हणाले की, ‘आम्ही त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की, सध्या पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू आहे आणि त्यामुळे आम्ही फाइल आणू शकलो नाही. पण ते रागावले आणि त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला. त्यांनी खोलीचा दरवाजा बंद करून खुर्ची उचलून आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत महापात्रा यांचा उजवा हात मोडला असल्याचं रघुनाथ मुर्मू मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर अश्विनी मलिकही जखमी झाले आहेत. मंत्री म्हणाले- प्रतिमा खराब करण्याचे षड्यंत्र दोन्ही अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले. त्यानंतर मलिक यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. दुसरीकडे केंद्रीय मंत्र्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, हे खोटे आणि निराधार आरोप आहेत. आपली प्रतिमा खराब करण्यासाठी दोन्ही अधिकारी खोटे आरोप करत असल्याचा दावा तुडू यांनी केला. मात्र, केंद्रीय मंत्र्यांनी आपण दोन्ही अधिकाऱ्यांना आढावा बैठकीसाठी बोलावल्याचे मान्य केलं आहे. मात्र निवडणुकीच्या वेळापत्रकात व्यस्त असल्याचं कारण देत अधिकाऱ्यांना नंतर येण्यास सांगितलं असल्याचंही तुडू म्हणाले.