मुसळधार पावसामुळे यंदा जगात अनेक देशांना पुराचा फटका बसला आहे. युरोप, अमेरिका आणि आशिया तीनही खंडात अतिरेकी पावसामुळे बळी जात आहेत. थैमान आणि हाहाकाराचे भयावह फोटो..
महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांच्या पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी नदीला पूर आल्याने संपूर्ण चिपळूण शहरात पाणी शिरलं आहे. बाजारपेठ आणि एसटी स्टँड तर पाण्याखाली गेलंय.
काही दिवसांपूर्वीच जर्मनीत मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन ठप्प झालं होतं. पुराच्या थैमानात काही जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक अजूनही बेपत्ता आहेत.
चीनमध्ये चार दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत असून पूर्ण वर्षभरात जितका पाऊस पडतो, तितका पाऊस गेल्या चार दिवसांत पडला आहे.
बेल्जियममध्ये पाऊस, पुराने थैमान घातलं आहे. तिथे आतापर्यंत 18 हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
नेदरलँडमध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक घरे कोसळली असून, हजारो लोक बेघर झाले आहेत. तिथेही पूर बळींची नोंद झाली आहे.
अमेरिकेच्या अॅरिझोना प्रांताला पावसाने चांगलंच झोडपलं. मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने काही भागातील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता.
फिलिपिन्सच्या मनीला या राजधानीच्या शहरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे आणि जनजीवन विस्कळीत झालं आहे.