नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर: टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला तिसऱ्यांदा धमकीचा मेल आला आहे. ISIS काश्मीर या दहशतवादी संघटनेनं शनिवारी रात्री गंभीरला हा मेल पाठवला आहे. या ईमेलमध्ये दिल्ली पोलिसांचाही उल्लेख आहे. isiskashmir@yahoo.com या ईमेल आयडीवरून हा मेल गंभीरला पाठवण्यात आला आहे. त्यामध्ये दिल्ली पोलीस आणि IPS श्वेता आमचं काहीही करू शकणार नाहीत. पोलिसांमध्येच आमचे खबरी आहेत. या खबरींकडूनच तुझी सर्व माहिती मिळत आहे ’ असा दावा करण्यात आला आहे.
यापूर्वी गौतम गंभीरनं मंगळवारी रात्री दिल्ली पोलिसांना धमकीचा मेल आल्याची तक्रार केली होती. दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती डीसीपी सेंट्रल श्वेता त्रिपाठी यांनी दिली आहे. ISIS काश्मीर या दहशतवादी संघटनेनं ईमेल आणि फोनच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार गंभीरनं केली आहे. 2007 साली झालेला T20 वर्ल्ड कप आणि 2011 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कपमधील विजयात गंभीरची मोठी भूमिका होती. या दोन्ही वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये त्यानं टीम इंडियाकडून सर्वात जास्त रन केले होते. गंभीरनं 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला. सध्या तो पूर्व दिल्लीचा (East Delhi) भाजपा खासदार आहे.