नवी दिल्ली, 05 मार्च : जम्मू काश्मीरचे (Jammu-Kashmir) माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) हे नेहमी त्यांचे आक्रमक रुप आणि राजकीय भाषा यामुळे कायम चर्चेत असतात. मात्र दिल्लीमध्ये त्यांचं एक नवं रुप पाहयला मिळालं. पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांच्या नातीच्या लग्नामध्ये अब्दुल्ला यांनी हिंदी सिनेमाच्या गाण्यावर जोरदार नाच केला आहे. या खास प्रसंगात त्यांनी स्वत:सोबत कॅप्टन अमरिंदर सिंग यांना देखील नाचायला लावलं. या दोन्ही नेत्यांनी शम्मी कपूरच्या एका सिनेमातील ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर’ या गाण्यावर जोरदार नाच केला. त्यांचा हा डान्स सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. अमरिंदर सिंग यांची नात सहरिंदर कौर यांचं लग्न मागच्या आठवड्यात झालं. त्या लग्नाच्या पार्टीत अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी ‘गुलाबी आंखें जो तेरी देखी’ या गाण्यावर देखील फारुख अब्दुल्ला नाचताना दिसत आहेत. अब्दुल्ला यांनी खुर्चीवर बसलेल्या कॅप्टन अमरिंदर यांना उठवलं आणि स्वत:सोबत नाचायला भाग पाडलं. यावेळी पार्टीत उपस्थित असलेल्या अन्य मंडळींनी देखील त्यांना साथ दिली.
आजी-माजी मुख्यंत्र्याच्या नाचाचा हा व्हिडीओ अनेक युझर्ससह काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे राष्ट्रीय निमंत्रक सरल पटेल यांनी देखील शेअर केला आहे. ‘वय ही फक्त एक संख्या आहे, हे फारुख आणि अमरिंदर यांनी सिद्ध केलं आहे,’ असं कॅप्शन सरल पटेल यांनी या व्हिडीओला दिलं आहे.
(हे वाचा : केवळ अठरा वर्ष नाही, पदवीधर होईपर्यंत करावा लागणार मुलाचा सांभाळ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ) फारुख अब्दुल्ला यांच्या अनेक सर्जरी झाल्या आहेत. तसंच ते सध्या 83 वर्षांचे आहेत. तब्येतीची आणि वयाची मर्यादा असूनही त्यांनी ज्या पद्धतीनं नाच केला ते पाहून पार्टीत उपस्थित असलेले सर्व जण प्रभावित झाले होते. अमरिंदर सिंग यांच्या परिवारातील काही मंडळी देखील या नाचामध्ये सहभागी झाले होते.