नवी दिल्ली 15 फेब्रुवारी : जम्मूमधील वर्दळीच्या बसस्थानकाजवळ एका व्यक्तीकडून रविवारी आयईडी (IED) जप्त केलं गेलं. हे विस्फोटक साहित्या जप्त केल्यानं मोठी दुर्घटना टळली आणि पुलवामा हल्ल्याला दोन वर्ष पूर्ण झालेल्या दिवशीच दुसरा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळून लावण्यात आला. पोलिसांनी सांगितलं, की याप्रकरणी एक विद्यार्थी आणि इतर तिघांना अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी निशाण्यावर जम्मूमधील प्रसिद्ध रघुनाथ मंदीर होतं. जम्मू रेंजचे पोलीस महानिरीक्षक मुकेश सिंह यांनी सांगितलं, की दुसऱ्या एका कारवाईत सांबा जिल्ह्यातून 6 पिस्तुल आणि 15 छोटे आयईडी जप्त केले गेले आहेत. त्यांनी पत्रकारांना सांगितलं, की मागील 4 दिवसांपासून आम्ही हाय अलर्टवर होतो, कारण पुलवामा हल्ल्याला (Pulwama Attack) 2 वर्ष पूर्ण होत असल्यानं याच दिवशी जम्मू शहरात मोठा स्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट आहे. त्यामुळं, सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणची सुरक्षा वाढवण्यात आली होती, तसंच चौकशीदेखील केली जात होती. जवळपास 7 किलो आयईडी जप्त - सिंह यांच्यासोबत DGP दिलबाग सिंहदेखील होते. त्यांनी सांगितलं, की संबंधीत युवकाला बस स्थानकाच्या आवारात संशयित बॅगसोबत फिरताना पाहिलं गेलं होतं. त्याच्याकडून जवळपास 7 किलोग्राम आयईडी जप्त केलं गेलं. अजून विस्फोटक सक्रीय केले गेले नव्हते. पाकिस्तानातील संघटनेच्या म्होरक्याच्या आदेशानुसार करत होता काम - सिंह यांनी सांगितलं, की आरोपी पुलवामाच्या नेवा गावचा रहिवासी असून सुहैल बशीर शाह असं त्याचं नाव आहे. तो चंदीगडमधील एका कॉलेजमध्ये नर्सिंगचं शिक्षण घेतो. पाकिस्तानातील दहशतवादी संघचना अल बद्रसोबत संबंध असलेल्या त्याच्या म्होरक्यांनी त्याला जम्मूमध्ये आयईडी ठेवण्याचं काम सोपावलं होतं. त्याला 4 ठिकाणं दिली गेली होती. यात प्रसिद्ध रघुनाथ मंदीर, बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि लखदाता बाजार यांचा समावेश होता. आपलं काम पूर्ण करून त्याला श्रीनगरला जायचं होतं. सिंह यांनी सांगितलं, की अल बद्रचा सक्रीय दहशतवादी अतहर शकील खान त्याना श्रीनगर हवाई अड्ड्यावरर घेण्यासाठी येणार होता. खान यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. सिंह म्हणाले, की काश्मीरचा त्याचा विद्यार्थी मित्र असलेल्या काजी वसीमला या योजनेची माहिती होती, त्याला चंदीगडमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. तर, त्यांचा अन्य सहकारी आबिद नबीला श्रीनगरमधून ताब्यात घेतलं आहे. सिंह यांनी सांगितलं, की बॉम्ब निष्क्रीय करणारी टीम या आयईडीचा तपास करत आहेत. हे उपकरण बनवण्यासाठी आरडीएक्सचा वापर केला गेला आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.