एक्सेटर युनिव्हर्सिटीचे डॉ. मारियो जे मसाया म्हणाले, “आपल्या ग्रहावर (Earth) जसजशी तापमानवाढ होत आहे, तसतसं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की, महासागर अतिरिक्त उष्णता घेत आहेत आणि ती पाण्याच्या पृष्ठभागावरून स्वतःच्या आत घेत आहेत आणि खोलपर्यंत ही उष्णता पोहोचत आहे. हे लक्षात ठेवावं लागेल की, पृथ्वीवरील उर्जा असमतोल वाढीचा अंदाज लावताना आपल्याला खोल महासागरांचाही समावेश करावा लागेल. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
मुंबई, 19 जुलै- जागतिक तापमानवाढ, हवामान बदलामुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याचं अभ्यासकांचं मत आहे. जगातल्या काही देशांमध्ये अतिपावसानं गंभीर पूरस्थिती निर्माण होत आहे तर काही देशांमध्ये तीव्र उष्म्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र हवामानातले हे बदल अचानक झालेले नाहीत. गेल्या 46 वर्षांत विविध कारणांमुळे हवामानात बदल होत गेले. तसंच उष्णतेचं प्रमाणदेखील वाढत गेलं. नासानं पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातील बहुतेक पृष्ठभागावरील हवेचं तापमान दर्शवणारे 1976 आणि 2022 मधले दोन नकाशे जारी केले आहेत. त्यामध्ये वातावरणातल्या लहरी स्पष्टपणे दिसत असून काही भाग हा उष्ण तर काही भाग थंड दिसत आहे. हवामानातले बदल आणि त्यामुळे निर्माण होणारी स्थिती एकूण सर्वच घटकांसाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. `झी न्यूज हिंदी`ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. युरोप, उत्तर अमेरिका, मध्य पूर्व आणि आशियातल्या काही देशांसाठी जून आणि जुलै महिना अत्यंत त्रासदायक ठरला आहे. या भागात पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. अनेक भागांत उष्णतेच्या लाटेमुळे (Heat Wave) उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. पश्चिम युरोपात सध्या दुष्काळ पडला आहे. पोर्तुगाल, स्पेन आणि फ्रान्समधल्या काही भागांत तीव्र उष्णता आहे. पोर्तुगालमधल्या लिरिया येथे 13 जुलै रोजी 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या तीव्र तापमानामुळे 3000 हेक्टर म्हणजेच 7200 एकर क्षेत्र जळून गेलं आहे. निम्म्याहून अधिक देशांमध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आला. वाढत्या उष्म्यामुळे 14 ठिकाणी मोठ्या आगीच्या घटना घडल्या आहेत. ही आग अग्निशमन विभागाने आटोक्यात आणली. दुसरीकडे इटलीमध्ये (Italy) 3 जुलै रोजी उच्चांकी उष्णतेमुळे डोलोमाइट्समधल्या मर्मोलडा ग्लेशियरचा अर्थात हिमकड्याचा एक भाग तुटला. बर्फ आणि हिमस्खलनामुळे 11 पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. जून महिन्याच्या अखेरीस इराणमध्ये (Iran) पारा 52 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. चीनमध्ये (China) तीव्र उष्णतेमुळे रस्ते वितळले आणि आर्द्रताही खूप वाढली. दरम्यान, 13 जुलै 2022 रोजीची हवामानाची स्थिती दाखवणारा एक नकाशा नासानं नुकताच शेअर केला आहे. या नकाशात पूर्व गोलार्धातील बहुतेक पृष्ठभागावरील हवेचं तापमान दर्शवलं गेलं आहे. हा नकाशा गोडार्ड अर्थ ऑब्झर्व्हिंग सिस्टीमच्या (GEOS) जागतिक मॉडेलच्या एका व्हर्जनमध्ये दिसून आलेल्या निरीक्षणांना एकत्रित करून तयार केला गेला आहे. यात वातावरणातल्या भौतिक प्रक्रिया मांडण्यासाठी गणितीय समीकरणांचा वापर केला जातो. तसंच नासानं 1976 आणि 2022 मधली हवामानाची तुलनात्मक स्थिती दर्शवणारा नकाशा प्रसिद्ध केला आहे. गेल्या 46 वर्षांत पृथ्वीवरची (Earth) स्थिती कशी बिघडली हे या नकाशात दर्शवलं गेलं आहे. 1976 पासून 2022 पर्यंत पृथ्वीवरचा काही भाग निळ्यापासून (थंड) लाल (उष्ण) कसा होत गेला हे या नकाशातून दिसून येतं. (हे वाचा: जेम्स वेब दुर्बिणीची सर्वात मोठी कामगिरी; भविष्यात पृथ्वीच्या बाहेरही राहता येणार? ) याबाबत नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरच्या ग्लोबल मॉडेलिंग आणि अॅसिमिलेशन ऑफिसचे अध्यक्ष स्टीव्हन पावसन यांनी सांगितलं, ``नकाशात वेगवेगळ्या ठिकाणच्या हवामानाच्या लहरीचा नमुना स्पष्टपणे दिसून येतो. यात काही भाग निळा (थंड) तर काही भाग लाल (उष्ण) दिसतो. मानवाकडून होत असलेल्या प्रदुषणामुळे हरितगृह वायू वाढत आहेत, त्यामुळे तापमानात सातत्याने वाढ होत आहे आणि लोकांचं जीवन उद्धवस्त होत आहे. मोठ्या क्षेत्रावर असलेली प्रचंड उष्णता हा त्याचा पुरावा आहे. ``