अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पूर आला असून व्हाईट हाऊसमध्ये देखील पाणी शिरलं आहे.
पावसामुळे वॉशिंग्टनमधील बऱ्याच भागांमध्ये पाणी शिरलं असून लोक गाड्यांवर उभे राहून बाहेर पडण्याकरता मदत मागत आहेत.
दरम्यान, प्रशासनानं सध्यस्थिती पाहता नॉर्थवेस्टर्न डीसी, सदर्न मोंटगोमरी, ईस्ट सेंट्रल लॉडन काऊंडी, फॉल्स चर्च येथील लोकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
दक्षिण वॉशिंग्टनमधील ट्रेन सेवा देखील रद्द करण्यात आली आहे. ही परिस्थिती किती दिवस कायम राहणार याबाबत मात्र काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
पोटोमॅक नदीला पूर आल्यानं आसपासच्या परिसराला असलेला धोका वाढला आहे. रस्त्यांवर पाणी असल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत.
फॉक्स न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडणार आहे. त्यामुळे लोकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.