नवी दिल्ली, 14 मे: Delhi Mundka Fire: दिल्लीतील (Delhi) मुंडका मेट्रो स्टेशनजवळील (Mundka metro station) चार मजली कमर्शिअल इमारतीला शुक्रवारी भीषण आग (Fire) लागली. या आगीत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या आगीची माहिती मिळताच अनेक लोकं तिथे तात्काळ जमा झाले आणि त्यांनी बचावकार्य (Rescue Operation) सुरु केलं होतं. आगीची तीव्रता पाहून आजूबाजूच्या अनेक भागातील लोक जमा झाले. यादरम्यान आगीत आणखी लोक अडकण्याची शक्यता पाहता मुंडका आणि आजूबाजूच्या भागातील लोकांनी व्हॉट्सअॅपच्या (WhatsApp) माध्यमातून इतर लोकांना माहिती देऊन लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचण्यास सांगितलं. यावेळी क्रेनचीही व्यवस्था करण्यात आल्याचं स्थानिक रहिवासी रमेश यांनी सांगितलं. आग दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचेपर्यंत सुमारे 100 लोकांना बाहेर काढण्यात आलं. आमचे प्रयत्न बराच वेळ चालले, पण जेव्हा आगीनं संपूर्ण इमारतीला वेढलं, तेव्हा आमच्याकडे काहीच उरले नाही, असं रमेश यांनी सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मोठ्या संख्येनं लोक होते. अशा परिस्थितीत आम्ही दुसऱ्या मजल्यावरून लोकांना बाहेर काढण्यावर अधिक भर दिला. व्हॉट्सअॅप मेसेज पाहिल्यानंतर आजूबाजूचे सुमारे दोनशे लोक येथे पोहोचले. सचिन यांनी सांगितलं की, त्यांनी असा अपघात यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. ही एक भयानक घटना आहे. एवढ्या लोकांचा एकत्रित मृत्यू झाल्यानं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशी घटना घडू नये. दिल्लीतील मुंडका मेट्रो स्थानकाजवळील तीन मजली व्यावसायिक इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी भीषण आग लागली होती. या भीषण घटनेत 27 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्याचवेळी 10 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा कारवाई करत पोलिसांनी इमारतीचे मालक हरीश गोयल आणि वरुण गोयल यांना ताब्यात घेतलं. घटनास्थळी एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरू आहे.