कन्याकुमारी, 10 मार्च : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांच्या एका छोट्या फॅनचं मन जिंकले आहे. राहुल सध्या दक्षिण भारतामध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. तामिळनाडूत प्रचार करताना कन्याकुमारीमध्ये राहुल यांची भेट अँटनी फ्लेक्स (Antony Felix) या 12 वर्षाच्या मुलाशी झाली होती. या भेटीत राहुल यांनी त्याला मदत करण्याचे वचन दिले होते. ते त्यांनी पूर्ण केले आहे. काय दिले होते वचन? राहुल काही दिवसांपूर्वी कन्याकुमारीमध्ये रस्त्याच्या बाजूला एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यावेळी त्यांनी नजर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री कामराज यांचा फोटो घेऊन उभ्या असलेल्या फ्लेक्सला पाहिले. राहुल फ्लेक्सशी गप्पा मारु लागले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की फ्लेक्सने पायात काहीही घातलेले नाही. या छोट्याश्या भेटीत ‘आपल्याला पळायला आवडते’ हे देखील त्याने राहुल यांना सांगितले. इतकंच नाही तर आपण 100 मीटरच्या शर्यतीमधील चांगले रनर असल्याचंही फ्लेक्स राहुल यांना म्हणाला. त्यावेळी राहुल यांनी फ्लेक्सला पळायला सोपे जावे म्हणून स्पोर्ट्स शूज देण्याचं वचन दिले. त्याचबरोबर त्याला स्पोर्ट्स अकादमीमध्ये प्रवेश मिळावा यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितले. (हे वाचा : विधानसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला मोठा झटका, ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला रामराम ) राहुल यांनी यावेळी फ्लेक्सशी आहार ते प्रॅक्टीसपर्यंतच्या अनेक विषयावर गप्पा मारल्या. त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकून देशाचं नाव उंच कर’ असा आशीर्वाद देखील त्याला दिला. इतकंच नाही तर ‘रोड शो’ मध्ये सहभागी होण्यापूर्वी राहुल त्याच्या घरी देखील गेले होते. आता राहुल यांनी आपले हे आश्वासन पूर्ण करत फ्लेक्सला स्पोर्ट्स शूज पाठवले आहे. काँग्रेसनं तामिळनाडूमध्ये द्रमुक (DMK) पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला फक्त 25 जागा आल्या आहेत. यापूर्वी 2016 साली काँग्रेसनं द्रमुक आघाडीकडूनच 41 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी फक्त 8 जागांवर विजय मिळवला होता. तर 2011 साली काँग्रेसनं 61 जागी निवडणूक लढवून 5 जागा जिंकल्या होत्या. तामिळनाडू विधानसभेच्या सर्व 234 जागांसाठी 6 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.