सांगली, 01 नोव्हेंबर: कर्नाटकमधील (Karnataka Belgaum issue) सीमावासियावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी हाताला काळ्या फिती लावून निषेध केला. महाराष्ट्रतील राष्ट्रवादीचे सर्व नेते, कार्यकर्ते आज हाताला काळ्या फिती लावून कर्नाटक सरकारचा निषेध करत आहे. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागात 1 नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळला जात आहे. सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ 1 नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधत कामकाज पाहणार आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष , जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आपल्या हाताला काळी फित बांधून कामकाजाला सुरुवात केली आहे.
जयंत पाटील यांनी 30 ऑक्टोबर रोजी ‘बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागात 1 नोव्हेंबर रोजी काळा दिवस (Black Day)पाळला जातो. सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ यंदा 1 नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधत कामकाज पाहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाच्या सर्व पदाधिकारी, युवक, युवती, इतर सेल व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, 1 नोव्हेंबर रोजी आपणही काळ्या फिती बांधत सीमाभागातील मराठी बांधवांना आपला पाठिंबा द्यावा. सीमाभागातील मराठी बांधवांचा आवाज बुलंद करू, दडपशाहीचा धिक्कार करू’ असं म्हणत आवाहन केले होते. दरम्यान, बेळगावसह सीमा भागामध्ये दरवर्षीप्रमाणे आज काळा दिन साजरा होत नाही आहे. कोरोनाचे कारण देत कर्नाटक पोलिसांनी अनेक अटी सीमावासीयांवर लादल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी निघणारी मूक सायकल रॅली यंदा रद्द करण्यात आली आहे. पण शहरातल्या मराठा मंदिरामध्ये ठराविक मराठी भाषिकांच्या उपस्थितीत आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.