नवी दिल्ली, 31 मार्च : थेट आणि आक्रमक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले भाजपा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी (Dr. Subramanian Swamy) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वामी सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहेत. आता त्यांनी पाकिस्तानच्या प्रश्नावर सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. भारताबरोबरच्या व्यापाराबाबत पाकिस्तानमध्ये बुधवारी एक महत्त्वाची बैठक होत आहे. पाकिस्तानशी पुन्हा व्यापार सुरू करण्याचे संकेत भारताने देखील दिले आहेत. दोन्ही देशांमधील व्यापार गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. पाकिस्ताननेच 2019 साली हा व्यापार एकतर्फी बंद करण्याची घोषणा केली होती. आता बुधवारच्या बैठकीत पाकिस्तान सरकार या निर्णयाची समीक्षा करणार आहे. स्वामी यांनी याच मुद्यावर सरकारवर टीका केली आहे. ‘काश्मीर मुद्यावर शरणागती. गुडबाय पीओके (POK). मला खात्री आहे की मोदी लवकरच इम्रान खानसोबत लंडनमध्ये जेवण करतील.’ असं ट्विट स्वामींनी केलं आहे.
मोदींनी लिहिले होते पत्र यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान नॅशनल डे च्या निमित्ताने इम्रान खान यांना पत्र लिहिलं होतं. ‘पाकिस्तानशी शांततेचे संबंध असावेत अशी भारताची इच्छा आहे. यासाठी परस्पर विश्वासासह दहशतवाद समाप्त होण्याची आवश्यकता आहे. कोरोना काळ हा मानवतेसाठी अत्यंत कसोटीचा काळ आहे. पाकिस्तानची जनता याचा धैर्याने सामना करेल,’ अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली होती. ( वाचा : पाकिस्तान भारतासोबत पुन्हा व्यापाराच्या तयारीत! इम्रान सरकार आज निर्णय घेणार ) इम्रान खान यांनी मोदींच्या या पत्राला उत्तर दिलं असून यामध्ये देखील काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. दक्षिण आशियातील शांतता आणि स्थिरता ही भारत-पाकिस्तान यांच्यातील काश्मीरसह अनेक मुद्यांवर अवलंबून आहे, असं उत्तर इम्रान खान यांनी दिले होते.