बिहारमध्ये विषारी दारुमुळे मृत्यूचं सत्र थांबेना
पाटणा, 17 डिसेंबर : संपूर्ण दारूबंदी असलेल्या बिहार मध्ये विषारी दारूचा कहर थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. छपरा येथील डेरणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विषारी दारूमुळे आणखी 2 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तानुसार, छपरामध्ये बनावट दारू पिऊन मृत्यू झालेल्यांची संख्या 76 वर पोहोचली आहे. अधिकृत मृतांची संख्या केवळ 34 आहे. याशिवाय सिवानमध्ये 5 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. विषारी दारू प्यायल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. तर बेगुसराय येथे संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बनावट दारू प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. अतिरिक्त एसपी या टीमचे नेतृत्व करणार आहेत. पोलीस अधीक्षक संतोष कुमार यांनी मीडियाला सांगितले की, एसआयटीमध्ये 31 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात तीन डीएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. सारणचे डीएम राजेश मीना यांनी सांगितले की, गेल्या 48 तासांत संपूर्ण जिल्ह्यात छापे टाकून 126 मद्यविक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे. चार हजार लिटरहून अधिक अवैध दारूही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात काही जणांच्या अटकेची बाबही समोर आली आहे. वाचा - बिल्किस बानो यांना धक्का, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली फेरविचार याचिका अशाप्रकारे बिहारमध्ये बनावट दारू पिऊन मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 82 वर पोहोचली आहे. सिवान जिल्ह्यातील भगवानपूर पोलीस स्टेशन परिसरात कथितपणे बनावट दारू प्यायल्याने चार जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. एप्रिल 2016 मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने बिहारमध्ये दारू विक्री आणि सेवनावर बंदी घातली होती. अलीकडेच, राज्यात बनावट दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंवरून विरोधकांनी विशेषतः भाजपने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपने बिहारमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.
भाजप नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपाल फागू चौहान यांना भेटण्यासाठी गेले होते. दरम्यान, छपरा बनावट दारू प्रकरणी विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) तपास करण्याची मागणी करणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत अवैध दारू निर्मिती, व्यापार आणि विक्रीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र तपास आणि कृती आराखडा तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच पीडितांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याची मागणीही सरकारकडे करण्यात आली आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी या प्रकरणाच्या सुनावणीस नकार दिला. याचिकाकर्त्याला हिवाळी सुट्टीनंतर हे प्रकरण पुन्हा हाती घेण्यास सांगण्यात आले. दारूमुळे मृत्यू झाल्यास कोणतीही भरपाई दिली जाणार नाही : नितीशकुमार बिहार विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, दारूमुळे कोणाचाही मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई दिली जाणार नाही. नितीश पुन्हा एकदा म्हणाले की, दारू पिले तर मराल. राष्ट्रपिता बापूंनी दाखविलेल्या मार्गावर आपण चालत असल्याचे ते म्हणाले. इतर राज्यांमध्येही बनावट दारू प्यायल्याने लोक मरत आहेत. भाजपने दारूबंदीचे समर्थन केले होते.