JOIN US
मराठी बातम्या / देश / पृथ्वीच्या पोटात ज्ञानाचं भांडार, आशियातील सर्वात मोठं भूमिगत वाचनालय भारतात

पृथ्वीच्या पोटात ज्ञानाचं भांडार, आशियातील सर्वात मोठं भूमिगत वाचनालय भारतात

छापील पुस्तकांची लोकप्रियता कमी होत असताना राजस्थानमध्ये मात्र, एक अनोखं ग्रंथालय अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. हे ग्रंथालय जमिनीपासून 16 फूट खाली असलेल्या एका मंदिराच्या तळघरात तयार केलेलं आहे.

जाहिरात

आशियातील सर्वात मोठं भूमिगत वाचनालय भारतात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सध्या माहिती व तंत्रज्ञानाचं युग आहे. या क्षेत्रात दररोज झपाट्याने बदल होत आहे. सतत होत असलेल्या संशोधनामुळे आपल्या हातात नवनवीन टेक्नॉलॉजी येत आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टींमध्ये बदल झाले आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर पुस्तकांचं सांगता येईल. पूर्वी आपण वाचनासाठी छापील पुस्तकांचा आणि ग्रंथालयांचा वापर करायचो. मात्र, टेक्नॉलॉजीतील प्रगतीमुळे त्यांची जागा आता डिजीटल पुस्तकांनी आणि डिजीटल ग्रंथालयांनी घेतली आहे. कालांतरानं छापील पुस्तकं आणि मोठमोठी ग्रंथालयं अस्तित्वात राहतील की नाही, याबाबत अनेक वाचनप्रेमींच्या मनात शंकाही आहे. छापील पुस्तकांची लोकप्रियता कमी होत असताना राजस्थानमध्ये मात्र, एक अनोखं ग्रंथालय अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. हे ग्रंथालय जमिनीपासून 16 फूट खाली असलेल्या एका मंदिराच्या तळघरात तयार केलेलं आहे. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. राजस्थानातील जैसलमेर-पोखरण दरम्यान भदियाराय माता मंदिर आहे. या मंदिराच्या तळघरात एक भव्य ग्रंथालय आहे. याची निर्मिती अनेक वर्षांपूर्वी हरवंशसिंह निर्मल उर्फ भदरिया महाराज यांनी केली होती. या ग्रंथालयात तुम्हाला जगभरातील पुस्तकं, कादंबऱ्या, हस्तलिखितं आणि पंतप्रधानांपासून राष्ट्रपतींपर्यंतची भाषणं मिळतील. जगाच्या कानाकोपऱ्यातून इथं पुस्तकं आणली गेली आहेत. यातील काही पुस्तकं भदरिया महाराजांनी स्वतः आणली होती. तर काही त्यांना भेट मिळालेली आहेत. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, हरवंशसिंह निर्मल हे मंदिराजवळील एका खोलीत नऊ वर्षे वास्तव्याला होते. या काळात त्यांनी ही सर्व पुस्तकं वाचली होती. त्यानंतर याच ठिकाणी ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. सध्या या ग्रंथालयात नऊ लाखांपेक्षा जास्त पुस्तकं आहेत. ‘अशा’ प्रकारे केली जाते लाखो पुस्तकांची देखभाल या ग्रंथालयातील पुस्तकं खराब होऊ नयेत म्हणून दर पाच ते सहा महिन्यांनी त्यावर विशेष लेप आणि पावडर लावली जाते. पुस्तकांची कपाटंदेखील स्वच्छ केली जातात. पुस्तकं ठेवण्यासाठी सुमारे 562 कपाटं आहेत. या ग्रंथालयात सात धर्मांचं संपूर्ण साहित्य उपलब्ध आहे. यासोबतच वेदांची संपूर्ण मालिका, भारतीय राज्य घटना, पुराणं, विश्वकोश, आयुर्वेद, इतिहास, अनुभवावर आधारित कांदबऱ्या, उपनिषदं, देशाच्या सर्व पंतप्रधानांची भाषणं, विविध संशोधनात्मक पुस्तकांसह लाखो पुस्तकं येथे ठेवण्यात आली आहेत. ( यशस्वी करिअर घडवण्यासाठी जाणून घ्या ‘या’ गोष्टी, जीवनात नेहमीच उपयोगी पडतील ) ज्ञानाचं भांडार असलेली ही जागा आशियातील सर्वांत मोठ्या ग्रंथालयांपैकी एक आहे. कारण हे ग्रंथालय एवढं मोठं आहे की त्यात एकावेळी चार हजारांहून अधिक लोक बसून वाचन करू शकतात. जगदंबा सेवा समिती या जागेची देखभाल करते. या समितीची स्थापना भदरिया महाराज यांनीच केली होती. अशी भव्य ग्रंथालयं आजकाल फक्त पीरियड ड्रामा चित्रपटांमध्येच बघायला मिळतात, असा समज असलेल्यांसाठी राजस्थानमधील हे ग्रंथालय एक आश्चर्याचा धक्काच असेल. वाचनाची प्रचंड आवड असलेल्यांनी भेट देण्यासाठी ही सर्वांत उत्तम जागा ठरू शकेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या