मुंबई, 17 जून : लष्करातील भरतीबाबतच्या अग्निपथ अग्निपथ योजनेला देशभरातून (Agnipath Scheme Protest) विरोध सुरू आहे. उत्तर भारतामध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचे लोण आता दक्षिण भारतामध्येही पसरले आहे. रेल्वे सेवेला याचा मोठा फटका बसलाय. या विरोधानंतरही या योजनेच्या अमंलबजावणीवर लष्कर ठाम आहे. थल सेना प्रमुख मनोज पांडे यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली आहे. पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘2022 मधील भरतीसाठी वयोमर्यादा 23 वर्ष करण्याचा सरकारचा निर्णय आम्हाला मिळाला आहे. कोरोना महामारीच्या काळातही जे भर्ती परीक्षेसाठी तयारी करत होते अशा तरूणांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून पुढील 2 दिवसांमध्ये http://joinindianarmy.nic.in नोटीफिकेशन जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर सेना भरतीबाबतचा विस्तृत कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. डिसेंबर 2022 पूर्वी अग्नीविरांची पहिल्या बॅचचं प्रशिक्षण सुरू होईल.’ भारतीय सेनेत सहभागी होण्याची मोठी संधी यामधून प्राप्त झाली आहे, त्याचा फायदा घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
यापूर्वी वायू सेना प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनीही वयोमर्यादेमध्ये वाढ करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. ‘तरूणांच्या कमाल वयाची मर्यादा 23 वर्ष करण्यात आल्याचा मला आनंद आहे. या योजनेचा तरूणांना फायदा होणार आहे. भारतीय वायू सेनेतील भर्ती प्रक्रिया 24 जून रोजी सुरू होईल.’ असे चौधरी यांनी जाहीर केले होते. अग्निपथ योजनेविरोधातील आंदोलकांचा मुंबई मेलवर दगडांनी हल्ला; प्रवाशांच्या जीवाशी खेळ, Live Video केंद्र सरकारने आता तरुणांचा राग शांत करण्यासाठी भरतीच्या वयोमर्यादेत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही सवलत केवळ एक वेळसाठी असेल आणि त्यानंतर अग्निपथ योजनेच्या वयोमर्यादेनुसार भरती होईल. सध्या, नवीन अग्निपथ योजनेत भरतीसाठी सरकारने वयोमर्यादा 17.5 वर्षे ते 21 वर्षे निश्चित केली आहे. परंतु लवकरच सुरू होणाऱ्या तीन सेवांच्या पहिल्या भरतीमध्ये 23 वर्षांपर्यंतचे तरुणही अर्ज करू शकतील.