नवी दिल्ली, 6 सप्टेंबर : दिल्लीहून (Delhi) लंडनसाठी (London) उड्डाण घेण्याच्या बेतात असलेल्या एअर इंडियाच्या (Air India) विमानात मुंग्या (Ants) असल्याचं लक्षात आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. या विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये मुंग्या झाल्याचं प्रवाशांना लक्षात आलं. विमान धावपट्टीवरून उड्डाण घेण्याच्या बेतात असतानाच बिझनेस क्लासमध्ये मुंग्या आढळल्यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आलं. मध्यरात्री गोंधळ दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मध्यरात्री 2 वाजता लंडनला जाणारं विमान उड्डाण करणार होतं. सर्व औपचारिकता पूर्ण करून विमानात प्रवासी स्थिरावले होते. त्यातील अनेकजण झोपेच्या अधीन होत होते. तर मध्यरात्र उलटून गेल्यामुळे अनेकांवर झोपेचा अंमल चढायला सुरुवात झाली होती. अशातच बिझनेस क्लासमधील काही प्रवाशांना मुंग्या असल्याचं लक्षात आलं. त्यांनी ही बाब कॅबिन क्रूच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर एअर इंडिया प्रशासनानं विमान बदलण्याचा निर्णय घेत नवं विमान प्रवाशांना उपलब्ध करून दिलं. मुंगीमुळे महाभारत ऐन मध्यरात्री विमानात स्थिरावलेल्या प्रवाशांना काही मुंग्यांमुळे पुन्हा सगळं सामान हातात घेऊन विमानातून बाहेर यावं लागलं. या सगळ्यात विमानाचं उड्डाण 3 तासांपेक्षाही जास्त काळ रखडलं. एआय-111 या विमानाचं मध्यरात्री 2 वाजता होणारं उड्डाण अखेर पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी झालं. एका मुंगीमुळे लंडनच्या जाणाऱ्या विमानात घडलेल्या या महाभारताची जोरदार चर्चा प्रवाशांमध्ये रंगली होती. हे वाचा - Covishield चा दुसरा डोस 4 आठवड्यात घेण्याची परवानगी द्या; कोर्टाचा आदेश यापूर्वीही घडली होती अशीच घटना जुलै महिन्यात सौदी अरेबियाला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाबाबतही असाच प्रकार घडला होता. विमानाने उड्डाण केल्यानंतर त्याच्या काचेला तडा गेल्याचं वैमानिकाच्या लक्षात आलं होतं. सुदैवाने या विमानात एकही प्रवासी नव्हता. केवळ वैमानिक आणि केबिन क्रूचे 7 मेंबर्स होते. काचेला तडा गेल्याची बाब लक्षात येताच वैमानिकाने तिरुवनंतपुरम विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला होता.