तिरुअनंतपुरम, 05 सप्टेंबर : केरळच्या कोल्लम येथील अॅना एलिझाबेथ जॉर्ज या तरुणीनं तेथील प्रसिद्ध ओणम सणानिमित्त सर्वसाधारण आकारातील खाता येईल अशी साडी (edible real size saree) तयार केली आहे. जगातील ही पहिलीच खाता येईल अशी साडी असल्याचा दावा अॅनानं केला आहे. या साडीचे डिझाईन, रचना जॉर्जने तिच्या स्वयंपाकघरात केली होती. पाककला तज्ज्ञ अॅनाला प्रत्येक वेळी क्रिएटिव्ह आणि काहीतरी हटके गोष्टी करायला आवडतात. तिनं कसावू साडी डिझाईन केली आहे, जी केरळमध्ये विशेष प्रसंगी घातली जाते. ही अर्ध्या पांढऱ्या रंगाची साडी सोनेरी जरीच्या बॉर्डरने सजलेली आहे. अॅना जॉर्ज ही एक फॅशन डिझायनर आणि फुले विक्रेतीही आहे, ती आयुष्यातील खडतर आव्हानांना सामोरे जाण्यास नेहमी तयार आहे. अॅनानं काही दिवसांपूर्वी कॅन्सर आणि न्यूरोबायोलॉजीमध्ये पीएचडी पूर्ण केली आहे. त्यानंतर तिनं आपला वेळ खाद्य (खाता येतील अशा) साड्यांच्या नियोजनात घालवला होता. ती म्हणते हे एक माझं स्वप्न होते जे आता सत्यात उतरलं आहे.
ही साडी बनवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी अॅनाला एक आठवडा लागला. साडीचं वजन 2 किलो आहे. या साडीचा बेस बनवण्यासाठी अॅनानं स्टार्चवर आधारित वेफर पेपर वापरला आहे. पारंपारिक पद्धतीनुसार ही साडी दिसण्यासाठी त्यावर सोनेरी रंगाची चमकी वापरली आहे. हे वाचा - केसांचा बन, नाकात नथ आणि लेहंगा, समंथाचा हा लुक तुम्ही पाहिलात का? साडी बनवण्याच्या संपूर्ण कामासाठी तिला 30,000 रुपये खर्च आला. अॅना या आगळ्या-वेगळ्या कलाकुसरीचे श्रेय तिच्या आजोबांना देते, ज्यांचे तीस वर्षांपूर्वी निधन झाले होते. अॅनाच्या म्हणण्यानुसार वाटते की तिला तिच्या स्वयंपाक कौशल्याचे गुण तेव्हाच मिळाले जेव्हा ती तिच्या आजोबांसोबत राहत होती.