जम्मू 10 जुलै : कोरोनामुळे दोन वर्ष बंद राहिल्यानंतर यंदा जुन महिन्यात अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra 2022) सुरुवात झाली होती. मात्र, आता खराब हवामानामुळे जम्मूतील अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आली आहे. येथून दक्षिण काश्मीरमधील गुहा मंदिराच्या बेस कॅम्पमध्ये कोणत्याही नव्या तुकडीला जाण्याची परवानगी दिली जात नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. शुक्रवारी अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे 16 जणांचा मृत्यू झाला तर 40 लोक बेपत्ता आहेत. अजूनही याठिकाणी बचावकार्य राबवण्यात येत आहे. एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “खराब हवामानामुळे जम्मू ते काश्मीरमधील दोन बेस कॅम्पपर्यंतची अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. कोणत्याही नवीन तुकडीला अमरनाथकडे जाण्याची परवानगी नाही.” 43 दिवस चालणाऱ्या वार्षिक यात्रेला 30 जूनपासून दोन मार्गांनी सुरुवात झाली. पारंपारिक मार्ग दक्षिण काश्मीरमधील अनंतनागच्या पहलगाममधील नुनवानपासून 48 किमी आहे. तर मध्य काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील बालटाल मार्ग हा आणखी 14 किमी लहान आहे. अमरनाथ घटनेत आतापर्यंत 16 भाविकांचा मृत्यू; डोंगराळ भागातच का होते ढगफुटी? वाचा कारण आतापर्यंत एक लाखाहून अधिक भाविकांनी गुहा मंदिरात पूजा केली आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर ही यात्रा 11 ऑगस्टला संपणार आहे. 29 जूनपासून, जम्मूतील भगवती नगर बेस कॅम्पमधून एकूण 69,535 यात्रेकरू 10 तुकड्यांमध्ये घाटीसाठी रवाना झाले आहेत. या निर्णयामुळे आता हजारो भाविकांना दर्शनाव्यतिरिक्त परतावे लागणार आहे. शुक्रवारी ढगफुटीमुळे आला पूर दक्षिण काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुहेजवळ शुक्रवारी संध्याकाळी ढगफुटीमुळे आलेल्या अचानक आलेल्या पुरात अनेक लोक वाहून गेले. ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 40 प्रवासी बेपत्ता आहेत. या अपघातात 65 जण जखमी झाले आहेत. मात्र, ही घटना ढगफुटीमुळे झाली नसल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे. या घटनेतील बाधित भाविकांच्या कुटुंबांसाठी हेल्पलाइन क्रमांक- NDRF- 011-23438252 011-23438253, काश्मीर विभागीय हेल्पलाइन- 0194-2496240 श्राइन बोर्ड हेल्पलाइन- 0194-2313149 जारी करण्यात आले आहेत. दुसरीकडे, जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मदत आणि बचाव कार्याला गती देण्याच्या आणि यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याच्या सूचना दिल्या आहेत.