नवी दिल्ली, 23 एप्रिल: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेनं (Corona virus 2nd wave) देशात हाहाकार उडवला आहे. कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ (Corona patients in India) होताना दिसत आहे. देशात अनेक ठिकाणी वैद्यकिय संसाधनाची कमतरता जाणवत आहे. देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता (Lack of oxygen) जाणवत आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे असंख्य रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी अनेक अडचणी समोर येत आहे. अशात रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी कोविड विरुद्धच्या लढाईत आता भारतीय वायूसेनाही (Indian Air force) उतरली आहे. गुरुवारी भारतीय वायूसेनेच्या विमानानं तीन रिकाम्या ऑक्सिजन कंटेनरला (Oxygen container Airlift) पश्चिम बंगालमधील पानागढ याठिकाणी पोहचवलं आहे. याठिकाणी या मोकळ्या कंटेनरमध्ये ऑक्सिजन भरला जाणार आहे. त्यानंतर हे कंटेनर ऑक्सिजनची कमतरता असणाऱ्या विविध ठिकाणी पोहचवण्यात येणार आहेत. त्यामुळे रुग्णांचा जीव वाचवण्यास मोठी मदत होणार आहे. याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितलं की, या कामासाठी वायुसेनेनं C-17 II-76 या अवजड वस्तूंची वाहतूक करणाऱ्या विमानाचा वापर केला आहे. या व्यतिरिक्त, हवाई दलाने कोविड चाचणी सेटला लेहपर्यंत पोहचवलं आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हवाई दलाने आरोग्य कर्मचारी, ऑक्सिजन कंटेनर, ऑक्सिजन सिलेंडर, ट्रॉली आणि इतर वैद्यकीय सामान देशात विविध ठिकाणी पोहचवण्यासाठी आपलं विमान तैनात केलं आहे. (वाचा- कोरोनायोद्ध्यांच्या मदतीला आता रणांगणावरचे खरोखरचे योद्धे ) राजधानी दिल्लीत डीआरडीओ हॉस्पिटल उभारण्यासाठी डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोची, मुंबई, विशाखापट्टनम आणि बंगळुरू येथून विमानात नेण्यात आलं आहे. त्याचबरोबर डीआरडीओच्या ऑक्सिजन कंटेनरलाही बंगळुरूहून दिल्लीच्या कोविड केंद्रांवर विमानाने पोहचवण्यात आलं आहे. देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडल्याने संरक्षण मंत्रालयाने सैन्य दलाच्या जवानांना मदतीसाठी पाचारण केलं आहे.