मुंबई, 18 जून : चायनीज फास्ट फुड मोमोज (Momos) आवडणारी अनेक मंडळी आहेत. या सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मोमोज गळ्यात अडकल्यानं एकाचा मृत्यू झाला आहे. देशात मोमोज खाल्ल्यानं मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. दिल्लीतील ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) यांनी हा खुलासा केला आहे. या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मोमोज खाणाऱ्या व्यक्तींमध्ये दहशतीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर एम्सनं एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. मोमोज खाल्ल्यानं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पोस्टमार्टम केल्यानंतर त्याच्या गळ्यात मोमोज अडकलेले आढळले. विंड पाईपमध्ये मोमोज फसल्यानं श्वसननलिकेत अडथळा निर्माण झाला आणि त्यामधून या व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती आता समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर मोमोज नीट चावून खावेत ते थेट गिळू नयेत असा इशारा एम्सच्या डॉक्टरांनी दिला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 लाख लोकांमधील एकाचा मृत्यू गळ्यात काही तरी अडकल्यानं होतो. मोमोज खाल्ल्यानं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वय साधारण 50 वर्ष होते. त्याला मृत्यूनंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ती व्यक्ती दक्षिण दिल्लीमधील एका हॉटेलमध्ये मोमोज खात होती. त्यावेळी अचानक ते जमिनीवर पडले आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांना पोलिसांनी एम्समध्ये दाखल केले. या व्यक्तीने दारू पिल्याचंही तपासणीमध्ये उघड झाले आहे. GF चा हात पकडणंही तरुणाला पडलं महागात; 8 वर्षांनंतरही कोर्टाने ठोठावली मोठी शिक्षा या व्यक्तीच्या गळ्यात मोमोजचा तुकडा अडकलेला आढळला. त्याचबरोबर त्याच्या पोटातही अल्कोहल मोठ्या प्रमाणात सापडले. ती व्यक्ती नशेत असल्यानं त्यानं थेट मोमोज गिळले. त्यामध्येच ते त्याच्या गळ्यात अडकले, अशी माहिती एम्सच्या डॉक्टरांनी दिली आहे.