नवी दिल्ली, 12 एप्रिल : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) चार शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. शाळेत कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. गाझियाबाद आणि नोएडातील (Noida and Ghaziabad) दोन-दोन शाळांमध्ये मिळून कोरोनाचे 19 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 13 जण नोएडातील खेतान शाळेत आहेत. विद्यार्थ्यांसह तीन टीचर्सदेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. नोएडातील DPS शाळेत एक विद्यार्थी संक्रमित आढळला आहे. तर गाझियाबादच्या सेंट फ्रान्सिस शाळेत आणि कुमार मंगलम शाळेत एकूण 5 जण पॉझिटिव्ह आहेत. कोरोना संक्रमण अधिक पसरू नये यासाठी तीनही शाळा काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाझियाबादच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात दोन शाळांमध्ये 5 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शाळा परिसर सॅनिटाइज करण्यात आला आहे. त्याशिवाय रॅपिड टेस्टही करण्यात आल्या आहेत. नोएडातील खेतान शाळेने प्रशासनाला कोरोनाबाबतची ही माहिती दिली. कोरोना संसर्गानंतर ऑफलाइन क्लास 13 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. शाळा पुन्हा पुढील काही दिवसांसाठी ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. 18 एप्रिल रोजी पुन्हा शाळा सुरू केल्या जातील. शाळेने दिलेल्या माहितीनुसार, 9वी आणि 12वी चे चार-चार विद्यार्थी आणि 6 चे तीन तर 8 व्या इयत्तेतील 2 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
पालकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही विद्यार्थ्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याला RTPCR निगेटिव्ह रिपोर्टसह 18 एप्रिल रोजी शाळेत पाठवा. लक्षणे नसलेल्यांसाठी रॅपिड टेस्ट अनिवार्य आहे.
गाझियाबादमध्येही रविवारी कोरोना संसर्गाची प्रकरणं वाढली आहेत. शनिवारी दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. रविवारी हा आकडा पाचवर पोहोचला, तर केवळ एका रुग्णाने कोरोनावर मात केली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 30 झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व रुग्ण धोक्याबाहेर असून त्यांच्यावर होम आयसोलेशनमध्ये उपचार करण्यात येत आहेत. जिल्हा निरिक्षण अधिकारी डॉ.आर.के.गुप्ता म्हणाले की, कोरोना संसर्गाचा धोका पूर्णपणे संपलेला नाही. कोणतीही निष्काळजीपणा संसर्गास उत्तेजन देऊ शकते. यामध्ये प्रत्येकाने आपापल्या स्तरावर सतर्क राहून कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गाची लक्षणे दिसल्यास त्वरित चाचणी करा. जेणेकरून वेळेवर उपचार करता येतील आणि कोरोनाचा संसर्ग पसरण्यापासून रोखता येईल.