तिरुवनंतरपुरम, 8 जुलै : कोरोनाचा पहिल्या रुग्ण सापडलेल्या केरळमध्ये (Kerala) आजही कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. देशातील केरळ हे राज्य सध्या कोरोनाने सर्वाधिक ग्रस्त आहे. अशा स्थितीत आणखी एका व्हायरसने डोकं वर काढल्यामुळे आरोग्य यंत्रणांसमोरचं आव्हान अधिकच बिकट झालं आहे. केरळमध्ये झिका व्हायरसचे (Zika Virus) 10 रुग्ण (10 patients) आढळून आले असून त्यात एका नवजात बाळाच्या मातेचा समावेश आहे. केरळमध्ये 13 जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’कडे पाठवण्यात आले होते. त्यापैकी 10 नमुने झिका पॉझिटीव्ह आढळले आहेत. यामध्ये तिरुवनंतपुरममधील नुकत्याच बाळाला जन्म दिलेल्या एका महिलेचा समावेश असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. 28 जूनपासून या महिलेला झिका व्हायरसची लक्षणं दिसायला सुरुवात झाली होती, मात्र आता तिच्यावर उपचार करण्यात येत असून ती लवकरच यातून बरी होईल, असं सांगण्यात आलं आहे. झिका व्हायरसचा इतिहास जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार झिका व्हायरसचा प्रादुर्भाव हा डासांपासून होतो. युगांडामध्ये 1947 साली पहिल्यांदा झिका व्हायरस हा माकडांच्या शरीरात आढळून आल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर 1952 साली हा व्हायरस माणसांच्या शरीरात आला. आतापर्यंत अफ्रिका, अमेरिका आणि आशिया खंडात या व्हायरसची माणसांना लागण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. हे वाचा - शेतकरी असे अडकले माशांच्या ‘जाळ्यात काय आहेत लक्षणं ताप, अंगावर पुरळ उठणं, अंगदुखी, सांधेदुखी आणि डोकेदुखी ही झिका व्हायरसची लक्षणं आहेत. यातील अनेक लक्षणं ही कोरोनाचीदेखील आहेत. केरळमधील रुग्णांना ही लक्षणं दिसू लागल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. पण त्यांना कोरोना नसल्याचं दिसून आल्यानंतर वेगळी चाचणी कऱण्यात आली. त्यातून त्यांना ‘झिका’ची लागण झाल्याचं दिसून आलं. हा आजार जीवघेणा नसला तरी त्याचं लवकर निदान होऊन उपचार सुरू होणं गरजेचं असल्याचं डॉक्टर सांगतात.