क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून डॉक्टरांनी रुग्णाला जीवनदान दिलं आहे. (File Photo)
नागपूर, 08 सप्टेंबर: श्वसननलिकेवर शस्त्रक्रिया करणं ही अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया मानली जाते. एक छोटीशी चूक रुग्णाच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे डॉक्टरांना अत्यंत सतर्क राहून ही शस्त्रक्रिया करावी लागते. अशी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया (Complicated surgery ) नागपुरातील डॉक्टरांनी करून दाखवली आहे. डॉक्टरांनी रुग्णाचा श्वास सुरू असताना श्वसननलिका कापून पुन्हा जोडली (trachea cut and reconnected) आहे. ही क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून डॉक्टरांनी रुग्णाला जीवनदान दिलं आहे. विशेष म्हणजे संबंधित शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला दिल्लीला जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण ही शस्त्रक्रिया नागपूरातच करण्यात आली आहे. नेमकं काय झालं होतं? अमरावती येथील रहिवासी असणाऱ्या 30 वर्षीय तरुणाचा काही दिवसांपूर्वी एक अपघात झाला होता. या अपघातात संबंधित तरुणाला डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यामुळे तेथीलच एका रुग्णालयात त्यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान डॉक्टरांनी व्हेंटिलेटरची नळी रुग्णाच्या घशापर्यंत टाकली होती. पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर ती नळी काढण्यात आली नाही. संबंधित नळी फार काळ श्वसननलिकेत अडकल्यामुळे श्वसननलिका अंकुचन पावली होती. जवळपास 2 मिमी एवढी श्वसननलिका अरुंद झाली होती. हेही वाचा- राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका वाढला, विजय वडेट्टीवारांनी दिले लॉकडाऊनचे संकेत परिणामी रुग्णाला श्वास घ्यायला अनेक अडचणी येऊ लागल्या होत्या. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. त्यासाठी स्थानिक डॉक्टरांनी संबंधित रुग्णाला दिल्लीला जाण्याचा सल्ला दिला. दरम्यान नागपूरातील क्रिम्स हॉस्पिटलमधील ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी ब्रोंकोस्कोपी केली. दरम्यान रुग्णाच्या श्वसननलिकेला सूज आल्याचं आणि श्वसननलिकेत पस जमा झाल्याचं निदान झालं. त्यामुळे तातडीनं शस्त्रक्रिया करणं गरजेचं बनलं. हेही वाचा- नागपूरमध्ये आली कोरोनाची तिसरी लाट, नवीन नियमावली जाहीर! पण अशाप्रकारची दुर्मीळ शस्त्रक्रिया करणं म्हणजे रुग्णाच्या जीवाला धोका होता. पण नागपूरातील शल्यचिकित्सक डॉ. गोपाल गुर्जर यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीनं ही अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. त्यांना श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. परिमल देशपांडे आणि डॉ. स्वप्निल बाकमवार यांनी मोलाची साथ दिली आहे. रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानं अनेकांनी वैद्यकिय टीमचं अभिनंदन केलं आहे.