नागपूर, 6 मे: राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या (Covid patient) संख्येत वाढ होत असल्याने गंभीर असलेल्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची (Remdesivir Injection) आवश्यकता भासत आहे. मात्र, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याचं समोर आलं आहे. याचाच फायदा काहीजण घेत असून रुग्णांच्या नातेवाईकांची लूट करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. आता असाच एक प्रकार नागपूर येथे उघडकीस आला आहे. नागपूरात कोरोना रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बदल्यात अॅसिडिटीचे इंजेक्शन (Acidity injection) दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) पाच जणांच्या टोळीला गजाआड केले आहे. नागपूरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. परंतु नागपूरात याच संबंधीत एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. नागपुरात जामठा परिसरातील कोविडालय नावाच्या रुग्णालयात काम करणाऱ्या दिनेश गायकवाड नावाच्या व्यक्तीने त्यांच्या रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल असलेल्या कोरोना रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शनच्या नावावर चक्क अॅसिडिटीचे इंजेक्शन टोचले आणि रेमडेसिवीरचे दोन डोस चोरी केले. वाचा: बीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO गणेश गायकवाड याने रुग्णालयाच्या रेकॉर्डवर तीन डोस रूग्णाला दिल्याची नोंद केली परंतु प्रत्यक्षात रुग्णाला फक्त एकच रेमडेसिवीरचा डोस देण्यात आला. उरलेले दोन डोस नागपूरला मित्राच्या मदतीने 35000 रुपये किमतीला विकण्याच्या वेळी पोलिसांनी त्यांना अटक केली. धक्कादायक बाब आहे या संपूर्ण प्रकरणात चार पुरुष आणि एक महिला फिजिओथेरपीस्टचा सुद्धा समावेश आहे. जी कमिशनच्या नादामध्ये अशा कामांमध्ये गुंतल्या गेल्याचे पोलीस सांगत आहेत. पोलिसांच्या मते सुदैवाने ज्या रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शनच्या ऐवजी अॅसिडिटीचे इंजेक्शन देण्यात आले होते तो रुग्ण बरा होऊन रुग्णालयातून घरी परत गेला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.