आदित्य ठाकरे भावुक
मुंबई, 6 एप्रिल : ठाण्यात काल (बुधवार) ठाकरे गटाने जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं. रोशनी शिंदे या शिवसेना पदाधिकारी महिलेला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ पोलीस आयुक्तालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. ठाकरे गटाच्या युवासेनेच्या सचिव दुर्गाताई भोसले-शिंदे या सुद्धा मोर्चात जोरदार घोषणा देत सरकारचा निषेध नोंदवत होत्या. मात्र, घोषणा देत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि रात्री त्यांची प्राणज्योत मालवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे ठाणे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर भावनिक पोस्ट लिहून श्रद्धांजली वाहिली आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे? ‘काल आम्ही आमचा सर्वात मेहनती, उत्साही, दयाळू, संवेदनशील युवासैनिक गमावली. दुर्गा भोसले-शिंदे जी आपल्यात नाहीत, यावर विश्वास ठेवणे अतिशय कठीण आणि दुःखद आहे. एक युवासैनिक आणि मित्र म्हणून त्यांचे जाणे माझ्यासाठी शब्दांत व्यक्त करणे, शक्यच नाही. ॐ शांती!’ असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
अवघ्या तिसाव्या वर्षी घेतला जगाचा निरोप युवा सेनेच्या सचिव दुर्गाताई भोसले या मुंबईच्या कंबाला हिल परिसरात राहतात. त्या अवघ्या 30 वर्षाच्या होत्या. इतक्या तरुण वयात मृत्यू झाल्याने शिवसैनिक हळहळ व्यक्त करत होत्या. त्या मोर्चासाठी काल ठाण्यात आल्या होत्या. घोषणा देत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. छातीत दुखू लागल्याने त्यांना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तातडीने विश्रांती घेण्यास सागितले. तसेच त्यांना तात्काळ उपचारासाठी मुंबईला पाठवले. दुर्गाताई यांना लगेचच बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचारही सुरू करण्यात आले. उपचार सुरू असतानाच काल रात्री 1.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं. वाचा - महाडिक आणि बंटी पाटील गटामध्ये राजारामच्या प्रचारात राडा, एकमेकांवर केले गंभीर आरोप संध्याकाळी अंत्यसंस्कार दुर्गाताई भोसले शिंदे यांच्या मागे पती, आई, वडील केशवराव भोसले आणि भाऊ असा परिवार आहे. आज सायंकाळी 5 वाजता धीरज अपार्टमेंट, पेडर रोड, जसलोक हॉस्पिटलच्या बाजूला, कंबाला हिल येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पार्थिवावर वाळकेश्वर येथील बाणगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.