मुंबई, 21 डिसेंबर : कोरोनाचा (corona) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron Variant) राज्याभरात हळूहळू पसरत चालला आहे. आज राज्यभरात एकूण 11 रुग्ण आढळून आले आहे. यापैकी 8 रुग्ण हे मुंबईत (mumbai) सापडले आहे. राज्यात ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 65 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती प्रसिद्ध केली आहे. आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ११ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ८ रुग्ण मुंबई विमानतळावरील तपासणीतील तर प्रत्येकी १ रुग्ण पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई येथे आढळला आहे. मुंबई विमानतळावर आढळलेल्या 8 रुग्णांपैकी 1 रुग्ण केरळ, गुजरात आणि ठाणे इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. यामध्ये अठरा वर्षांखालील दोन मुलांचा समावेश आहे. युंगाडा मार्गे दुबई असा २ प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर इंग्लंडवरून ४ तर दुबईवरून २ प्रवाशी आले आहे. सर्व रुग्णांना सौम्य लक्षणं जाणवत आहे. तर उस्मानाबादमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १३ वर्षी मुलीला ओमायक्रॉनची लागण झाली. तिला कोणतेही लक्षणे जाणवत नाही. केनियावरून हैद्राबाद मार्गे आलेल्या नवी मुंबई येथील एका १९ वर्षीय तरुण ओमायकॉन बाधित आढळला आहे. या तरुणाने लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले होते. त्याला कोणतीही लक्षण आढळत नाही. आजपर्यंत राज्यात एकूण ६५ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. तर आतापर्यंत 34 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली असता 34 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आढळून आले. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सोडून देण्यात आले.