मुंबईची लाईफ लाईन समजणारी जाणारी लोकल सेवाही याला अपवाद ठरली नाही.
मुंबई, 28 ऑक्टोबर : कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर लोकल गाड्या बंद करण्यात आल्या. 7 महिन्यानंतर अखेर आता लोकल महिला, वकील आणि सुरक्षा रक्षक तसेच कामगारांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. अशातच आता लवकरच सर्व प्रवाशांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत ठाकरे सरकारने दिले आहेत. मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी एका प्रवाशाच्या प्रश्वाला ट्विटरवर उत्तर देत लवकरच लोकल सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ असे संकेत दिले. लोकल बंद असल्यामुळे कामासाठी मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांना बस किंवा रस्ते मार्गानं जावे लागते. परिणामी ट्रॅफिकमध्ये त्यांचा अर्धा वेळ जातो, यामुळे एका संतप्त प्रवाशानं ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या पत्रात या प्रवाशानं महिलांना लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली तशी सर्वसामान्यांना आणि व्यावसायिक, कर्मचारी यांना का नाही? दिवाळी सणात प्रवास नाकारणं खूप मोठा अन्याय आहे, असे ट्वीट केले होते.
याला उत्तर देताना विजय वडेट्टीवार यांनी, येत्या काही दिवसात लोकलबाबत निर्णय घेऊ असे सांगत मुंबईकरांना दिलासा मिळेल असे संकेत दिले. याआधी वडेट्टीवार यांनी महानगरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानंतर सर्वांसाठी लोकल प्रवाशाची मुभा देण्याबाबत विचार करणार असल्याचे सांगितले होते.
याआधी झाली होती बैठक राज्य सरकार आणि रेल्वे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत खासगी क्षेत्रात काम करणारे नोकरदार आणि सर्वच प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याबाबत चर्चा झाली होती. महिलांना ज्याप्रकारे लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली त्याच धर्तीवर अन्य प्रवाशांना परवानगी देता येईल का?, त्यात वेळेचे बंधन घालावे का? याविषयी बैठकीत चर्चा झाली. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांची संख्या मोठी आहे. त्याअनुषंगाने लोकलसेवेवर किती ताण येऊ शकतो, याचाही विचार केला गेला. त्यामुळे लवकरच सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यात येऊ शकते.