' तुम्ही संसदेतही आम्ही सांगू तेच बोलायचे आणि संसदेबाहेरही आम्ही सांगतो तसेच वागायचे असा एकाधिकारशाहीचा वरवंटा फिरवला जात आहे.
मुंबई, 17 जुलै : ‘सध्याच्या पार्लमेंटचे एकंदरीत चित्र आधीच निराशाजनक आहे. त्यात एकीकडे तथाकथित ‘असंसदीय’ शब्दांची चिकटपट्टी संसद सदस्यांना लावण्यात आली आहे आणि दुसरीकडे संसद भवन परिसरात निदर्शने, धरणे, उपोषण, आंदोलन करण्याला केंद्र सरकारने बंदी घातली आहे. म्हणजे विरोधकांची शब्दांची शस्त्रेही निस्तेज करायची आणि शांततापूर्ण आंदोलनाच्या घटनात्मक अधिकारावरही गदा आणायची, असा हा संसदेची टाळेबंदी करण्याचा डाव आहे’ अशी टीका शिवसनेनेनं मोदी सरकारवर केली आहे. संसदेत शब्दांवर बंदी घातल्यामुळे देशभरात विरोधकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून या मुद्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. ‘भारतीय संसद अधिक सभ्य आणि सुसंस्कृत करण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसलेली दिसते. सरकारने ‘असंसदीय’ शब्दांची नवी यादी जाहीर केली आहे. जयचंद, शकुनी, जुमलाजीवी, दलाल, सांड, भ्रष्ट, असत्य, अपमान, तानाशाह, विनाश पुरुष, कालाबाजारी असे मजबूत शब्दभांडार संसदेत उधळण्यावर त्यामुळे निर्बंध येणार आहेत. ज्या शब्दांना लोकसभा सचिवालयाने ‘असंसदीय’ वगैरे ठरविले आहे ते शब्द आपल्या संसदीय संघर्षाचे वैभव आहे. त्यात असंसदीय असे काय आहे? भ्रष्टाचाराला भ्रष्टाचार म्हणायचे नाही. मग पर्यायी शब्द काय आहे? तानाशाह म्हणजे हुकूमशहाला काय दुसरी उपमा द्यायची? असा सवाल सेनेनं केला आहे. महाराष्ट्रात गद्दारीचा प्रयोग घडवून दिल्लीने लोकशाहीचा गळा घोटलाच आहे. या तानाशाहीवर संसदेत आवाज उठवताना आता सदस्यांनी काय व कसे मत व्यक्त करायचे? विरोधकांच्या जिभाच कापून त्या घटनेच्या, स्वातंत्र्याच्या चितेवर ठेवल्या आहेत. संसदेत विरोधकांनी सभ्य, सुसंस्कृत भाषेचा वापर करायचा. पण संसदेच्या बाहेर सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांनी शब्दांचे असंसदीय फवारे उडवायचे हे चालेल काय? मग संसदेतील हाच ‘तानाशाही’ नियम बाहेरही लावा व देशाच्या जिभेची टाळेबंदी केली असे एकदाचे जाहीर करा. हे तर आणीबाणीपेक्षा भयंकर आहे. जो पक्ष ‘‘आम्ही आणीबाणी व हुकूमशाहीविरुद्ध लढा दिला’’ असे उठताबसता बोलत असतो त्यांनीच असा घाव घालावा? असा टोलाही सेनेनं भाजपला लगावला. ( उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? दिपाली सय्यद यांनी मानले भाजपचे आभार ) सर्वोच्च न्यायालयात आजही न्यायाचा थोडाफार अंश जिवंत आहे व संसदेवरील गुरगुरणाऱ्या नव्या सिंहाची हिंमत जनतेच्या मनगटात आहे. संसद ही देशाची सर्वात मोठी न्यायपालिका आहे. लोकसभा व राज्यसभेचे कामकाज सभ्य, सुसंस्कृत, विनम्रतेनेच चालले पाहिजे. पण संसदेचा तो गौरव, सन्मान आज खरोखरच राहिला आहे काय? बहुमताच्या झुंडशाहीने अनेक विधेयके गोंधळात मंजूर करून घेतली जातात. विरोध करणाऱयांना ‘मार्शल’च्या मदतीने खेचत बाहेर काढले जाते. लोकशाहीची सरळ सरळ पायमल्ली करून आमदार, खासदार फोडून सरकारे बनविली जात आहेत. पुन्हा ही सर्व बेइमानी उघडय़ा डोळ्याने तोंडावर बोट ठेवून पहा, असेच फर्मान सुटले आहे, अशी टीकाही सेनेनं केली आहे. ( दैनंदिन राशिभविष्य : भाग्य साथ देणार; आज आर्थिक लाभ होणार ) ’ तुम्ही संसदेतही आम्ही सांगू तेच बोलायचे आणि संसदेबाहेरही आम्ही सांगतो तसेच वागायचे असा एकाधिकारशाहीचा वरवंटा फिरवला जात आहे. लोकशाही ही अशोक स्तंभावरील गुरगुरणाऱ्या सिंहासारखीच असायला हवी. पण सध्या राज्यकर्तेच गुरगुरत आहेत व संसदेचा भित्रा ससा करून ठेवला आहे. हरिशंकर परसाई यांनी म्हटले आहे, “हुकूमशहा हा एक डरपोक माणूस असतो. चार गाढवे एकत्र चरत असली तरी त्याला भीती वाटते की, आपल्याविरुद्ध कटकारस्थान चालले आहे’’ आजचे चित्र यापेक्षा वेगळे दिसत नाही’ अशी टीका सेनेनं केली आहे.