स्वतःस शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणवून घेणारे शिंदे वारंवार दिल्ली दरबारी का जात आहेत, हा प्रश्नच आहे.
**मुंबई, 20 जुलै : ‘**महाराष्ट्राची सूत्रे आज संपूर्णपणे दिल्लीच्याच हाती आहे. शिवसेना फोडणे व त्या फुटीचे नजराणे दिल्लीश्वरांच्या चरणी अर्पण करणे यातच मुख्यमंत्री शिंदे मश्गूल आहेत. राज्य बुडते आहे. ते बुडाले तरी पर्वा नाही, अशी सध्याच्या सत्ताधाऱ्यांची धारणा आहे. मात्र त्या प्रलयात महाराष्ट्राचा स्वाभिमान व मराठी अस्मिताही गटांगळय़ा खाताना दिसत आहे, हे गंभीर आहे. महाराष्ट्रावर सध्या अस्मानी संकट आहेच, पण सुलतानी संकटाने राज्य जास्त बेजार आहे. पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होते, आजचे सुलतान शिवसेना फोडत आहेत’ असं म्हणत शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. एकनाथ शिंदे यांनी आमदारांपाठोपाठ खासदारांचा गट शिवसेनेतून फोडला आहे. लोकसभेत शिवसेनेला वेगळा गट स्थापन झाला आहे. या निर्णयानंतर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून एकनाथ शिंदे गटावर टीका करण्यात आली आहे. ‘दिल्लीभेटीत त्यांनी मोदी-शहांच्या चरणी शिवसेना खासदारांचाही नजराणा चढवला व उपकाराच्या ओझ्यातून आणखी थोडे मुक्त झाले. स्वतःस शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणवून घेणारे शिंदे वारंवार दिल्ली दरबारी का जात आहेत, हा प्रश्नच आहे. शिंदे हे म्हणे मंत्रिमंडळाबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले. हे आक्रित आहे. यापूर्वी शिवसेनेचे तीन मुख्यमंत्री झाले. त्यातील दोन भारतीय जनता पक्षाबरोबरच्या ‘युती’त होते; पण एकही मुख्यमंत्री मंत्रिमंडळ काय व कसे करायचे याबाबत चर्चा करण्यासाठी कधी दिल्लीत गेला नाही. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. दिल्लीसमोर झुकल्याने, मोडून पडल्यानेच फुटीर गटाला मुख्यमंत्रिपद मिळाले हे आता उघड झाले. दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकला नाही, झुकणार नाही हा स्वाभिमानाचा मंत्र निदान यावेळी तरी दिल्लीने मोडून दाखवला’ असं म्हणत शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. ‘ज्या बारा खासदारांनी आता स्वतंत्र गट स्थापन केला ते शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले व लोकसभेत पोहोचले. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर आपण वेगळा गट स्थापन करीत आहोत या त्यांच्या बतावणीस अर्थ नाही. प्रत्येकाचे एक स्वतंत्र, व्यक्तिगत व केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाचे प्रकरण आहे. त्यातूनच हे पलायन घडले. हेमंत गोडसे, कृपाल तुमाने, सदाशिव लोखंडे, श्रीरंग बारणे, राजेंद्र गावीत, संजय मंडलिक, धैर्यशील माने असे खासदार ‘हिंदुत्व’ वगैरे मुद्दय़ांवर बोलतात ते आश्चर्यच आहे. त्यांचे मूळ व कूळ शिवसेनेचे किंवा हिंदुत्वाचे नव्हतेच. शिवसेनेकडून विजयाची संधी असल्यानेच ते भगव्याचे तात्पुरते शिलेदार बनले. नाहीतर यांचे गोत्र काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच आहे हे काय कुणाला माहीत नाही’ असं म्हणत शिंदे गटात सामील झालेल्या 12 खासदारांवर टीका केली. ‘भारतीय जनता पक्षातही आता मूळच्या हिंदुत्ववाद्यांपेक्षा अशा बाहय़ जात-गोत्र-धर्मवाल्यांचा भरणा झाला आहे. भाजपचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनकड हे अनेक पक्षांचा प्रवास करीत भाजपात पोहोचले. केंद्रीय मंत्रिमंडळातील निम्मे सदस्य हे मूळच्या हिंदुत्ववादी गोत्राचे नसून काँग्रेस किंवा अन्य जातकुळीतले आहेत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आज मूळ भाजपचे नाहीत, पण एखादे राज्य ताब्यात ठेवण्यासाठी, जिंकण्यासाठी काँग्रेस पक्षातून आलेल्या लोकांनाही भाजपने मुख्यमंत्रिपद दिले. केंद्रात पदे दिली. महाराष्ट्रात तरी वेगळे काय घडले? शिवसेनेला मुख्यमंत्रिपद सोडाच, पण उपमुख्यमंत्रिपदही त्यांनी दिले नाही. पण शिवसेना फोडून बाहेर पडलेल्यांना त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या पायघडय़ाच घातल्या आहेत. आता म्हणे खासदारांच्या ‘12’च्या गटासही मंत्रिपदाची बक्षिसी दिली जाणार. आता ही बक्षिसी म्हणजे शिवसेनेच्या वाट्यास नेहमीच आलेले अवजड उद्योग खाते असेल की आणखी कोणते असेल, ते कळेलच’ असा टोलाही सेनेनं लगावला.