मुंबई 24 नोव्हेंबर : राज्यातल्या सत्तापेचाच्या पार्श्वभूमीवर दररोज राजकीय घडामोडींना नाट्यमय वळणं मिळत आहेत. आपले सर्व आमदार पक्षासोबतच राखण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने खास बंदोबस्त केला असून आमदारांना मुंबईतल्या हॉटेमध्ये ठेवण्यात आलंय. अशा घडामोडी घडत असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा खुलासा केलाय. भाजपशी पुन्हा जुळवून घेण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संपर्क साधत आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यावरू त्यांची भूमिका स्पष्ट होते. भाजप आणि शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने शेवटपर्यंत ते एकत्र आले नाहीत. त्यामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. भाजपची मातृसंस्था असलेल्या संघानेही उद्धव ठाकरेंशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती खुद्द उद्धव ठाकरे यांनी दिलीय. पण आता खूप उशीर झाल्याचंही त्यांनी सांगितलं.शरद पवार आपल्यासोबत ठाम उभे आहेत त्यामुळे चिंता करायची गरज नाही आपण तिनही पक्ष एकत्र मिळून लढत आहोत असंही ते म्हणाले.
अजित पवारांचं वक्तव्य चुकीचं, शरद पवारांनी फटकारलं. ‘भाजपसोबत सरकार बनवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. राष्ट्रवादीने सरकार स्थापनेसाठी शिवसेना आणि काँग्रेससोबत आघाडी करण्याचं निश्चित केलं आहे. अजित पवार यांचं स्टेटमेंट चुकीचं, दिशाभूल करणारं आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी करण्यात आलेलं आहे,’ असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असून शरद पवार साहेब हे आमचे नेते आहेत, असं स्पष्ट केलं आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांची विधीमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी मांडलेली भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
‘काळजी करण्याचं कारण नाही. सगळं काही ठिक आहे. फक्त थोड्या संयमाची गरज आहे. तुमच्या पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच मी राष्ट्रवादीत असून यापुढेही कायम राष्ट्रवादीतच राहणार आहे. शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत. आमची भाजप-राष्ट्रवादी युती महाराष्ट्राला पुढील पाच वर्षांसाठी स्थिर सरकार देऊ. हे सरकार राज्याच्या विकासाठी कटिबद्ध असेल,’ असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.