मुंबई, 3 मे : इस्लामी कॅलेंडरमधील नववा महिना म्हणजेच रमजानचा महिना (Ramadan eid 2022). रमजान ईद किंवा ‘ईद-उल-फितर’ (Eid ul-Fitr) असं म्हटलं जाणारा हा सण मुस्लीम बांधवांचा धार्मिक सण आहे. ईद म्हणजे आनंद आणि फितर म्हणजे दान करणे. यालाच रमाथान किंवा रमादान असंही म्हंटलं जातं. रमजानच्या (Ramzan Eid Mubarak) या महिन्यात अन्नदानाला विशेष महत्त्व असते. दरम्यान या सणाची खरी झलक आपल्याला मुंबईच्या मोहम्मद अली रोडवर (Ramadan Eid on mohammed ali road, Mumbai) पहायला मिळते.
या महिन्यात मोहम्मद अली यांना अल्लाहकडून कुराण मिळाले अशी आख्यायिका आहे. कुराण हा मुस्लिमांचा धर्मग्रंथ आहे. महिनाभर मुस्लिम बांधव रोजे करतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत त्यांचा उपवास असतो व त्यानंतरच्या जेवणाला ‘इफ्तार’ म्हटलं जातं.
जसजशी ईद जवळ येते तसतसे त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असतो. रमजानच्या दिवशी चंद्रदर्शनाला विशेष महत्व असते. चंद्रदर्शन झाल्यानंतर मुस्लीम बांधवांचे रोजे संपतात. या पवित्र महिन्यात चांगली कर्म करण्यावरही त्यांचा भर असतो.
हे ही वाचा : ‘इसे कहते हैं ईद मनाना’ गुजरातच्या राशीदने स्वतःच्या हाताने बनवले जेवण अन्… VIDEO
मुंबईत मस्जिद बंदर जवळच मोहम्मद अली रस्ता आहे. वर्षातून एकदाच रमजानच्या महिन्यात तिथे खाद्यपदार्थांची मोठी रेलचेल असते. विशेषतः मांसाहार करणाऱ्यांसाठी ती खाऊगल्ली म्हणजे एक मोठी मेजवानीच असते. श्वार्मा , कबाब , विविध प्रकारचे मांसाहारी पदार्थ , चिकन सूप , इत्यादी पदार्थ तिथे खायला मिळतात. या बरोबरच रबडी जिलेबी, फालुदा, सांदल अशा एक ना अनेक मिठाईचे पदार्थांवरही खवय्ये ताव मारतात. सांदल ही मिठाई भात, नारळ आणि मलई यापासून बनवलेली असते , जिला रमजानच्या महिन्यात विशेष महत्त्व असते.
वाचा - बाजारातून घरी आणलेले आंबे आज्जी पाण्यात का ठेवायची? कारण वाचून तुम्ही म्हणाल आज्जी इज ग्रेट
वर्षभरात या एकाच महिन्यात मुंबईतील मोहम्मद अली रोड या ठिकाणी या मेजवाणीचा आस्वाद घेता येतो. रात्री सुरू होणारी छोटी मोठी दुकाने पहाटेपर्यंत खुली असतात आणि त्यावर खवय्ये खाण्याचा मनमुराद आनंद लुटतात. येथील खाद्यपदार्थ चाखण्यासाठी देशभरातून पर्यटक तसेच मुस्लिम बांधव येत असतात.
रमजानचा हा पवित्र महिना आजच्या दिवशी संपून मुस्लीम बांधव ईद साजरी करतील. आनंद आणि बंधुत्वाचे नाते टिकवून ठेवण्यासाठी या दिवशी गळाभेट घेण्यालाही फार महत्व आहे. हे लज्जतदार पदार्थ चाखण्यासाठी एकदा तरी मोहम्मद अली रोडवर जायलाच हवं. तोपर्यंत आपल्या सर्व मुस्लिम बांधवांना ‘ईद मुबारक’ !!