मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी शिवतीर्थावर मॉर्निग वॉकला गेले असता हल्ला करण्यात आला होता.
मुंबई, 04 मार्च : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला प्रकरण अखेर दोन जणांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. दोघेही भांडुप पश्चिम भागातील रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एक जण हा शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी शिवतीर्थावर मॉर्निग वॉकला गेले असता हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. या प्रकरणाचा सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास केला. अखेर या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. हे दोघे जण भांडुप पश्चिम भागातील रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस इतर संशयितांचा शोध घेत आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांपैकी सोळंकी असे एका संशयिताचे नाव असून तो शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. राजकीय वादातून हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे चौकशीत पोलिसांना समजले. दरम्यान, संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. हल्ला करून आरोप पळून जात असल्याचे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे.
सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसून येते की हल्ल्यानंतर, एक माणूस हातात स्टंप घेऊन जोरात धावत होता. यानंतर तो त्याच्या वाहनाजवळ गेल्यावर स्टंप फेकून पळून गेला. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, पोलिसांनी दोन आरोपींची ओळख पटवली. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 8 तुकड्या तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी तपास केला.