मुंबई, 17 फेब्रुवारी : TOPS SECURITY घोटाळा प्रकरणी MMRDA ने कोणालाही क्लीन चीट दिली नाही, असं धक्कादायक वक्तव्य MMRDA चे कमिशनर आर ए राजीव यांनी केले आहे. TOPS SECURITY घोटाळा प्रकरणी मंगळवारी ED ने MMRDA आयुक्त आर ए राजीव यांची चौकशी केली. तब्बल 9 तास चाललेल्या या चौकशीत ED ने आर ए राजीव यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला होता, अशी माहिती ईडी (ED) सूत्रांनी दिली. MMDRA चे कामकाज कसे चालते? कोण निर्णय घेतात? निर्णय घेण्याची प्रक्रिया काय असते? कोणत्या साली टाॅप्स सिक्युरीटीली कंत्राट देण्यात आले? हे कंत्राट देताना SOP चे पालन केले गेले होते का? कोणत्या आधारे टाॅप्स सिक्युरीटीला कंत्राट देण्यात आले? त्यात कोणत्या अटी शर्ती नमुद करण्यात आल्या होत्या? टाॅप्स सिक्युरीटीला दिल्या गेलेल्या कंत्राटातील SOP चे टाॅप्स सिक्युरीटीने पालन केले आहे का? टाॅप्स सिक्युरीटीला दिल्या गेलेल्या कंत्राटात गैर व्यवहार झाला होता का? गैर व्यवहार झाला असल्यास काय झाला होता? त्यावर MMRDA ने काय कारवाई केली होती? MMRDA ने कारवाई म्हणून काय केले होते? MMRDA ने केलेली कारवाई ही कायदेशीर अटींची पुर्तता करणारी होती का? असे विविध प्रश्न ED ने आर ए राजीव यांना विचारले असून या प्रश्नांची सविस्तर उत्तरे इडीने आर ए राजीव यांच्याकडून घेतली. MMRDA ने मुंबई पोलिसांच्या EOW या पथकाला लिहिलेल्या पत्रात TOPS SECURITY प्रकरणी कोणताच घोटाळा झाला नव्हता, असं पत्र लिहले होते. त्यावर ईडी चौकशीनंतर इडी कार्यालयाबाहेर पडलेले आर ए राजीव यांना प्रश्न विचारला असता MMRDA ने अशी कोणतीही क्लीनचीट दिली नाही, असं उत्तर राजीव यांनी दिले. टॉप्स सिक्युरीटीला 2014 ते 2017 या कालावधीत ट्रॅफिक वॉर्डन अर्थात सिक्युरीटी गार्ड पुरवण्याचं कंत्राट मिळालं होतं. हे कंत्राट 500 गार्ड पुरवण्याच होतं. मात्र, कंत्राट मिळाल्यावर टॉप्स सिक्युरीटीकडून केवळ 70 टक्के म्हणजे 350 गार्ड पुरवले जायचे आणि उरलेल्या गार्डची बोगस बिल काढून त्याचे पैसे लाटले जात होते असा आरोप करण्यात आला. काय आहे प्रकरण? ईडीच्या तपासात टॉप्स सिक्युरीटीला हे कंत्राट मिळवून देण्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी महत्वाची भूमिका बजावली असल्याचं म्हटलं आहे. तर टॉप्स सिक्युरीटीला कंत्राटात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा निकटवर्तीय अमित चंडोले याचा महत्वाचा रोल होता. अमित चंडोले हा आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने काम करायचा तर सिक्युरीटीलाच्या वतीने मॅनेजिंग डायरेक्ट एम शाशीधरण हा काम करायचा. MMRDA सुरक्षा रक्षक कंत्राटा मधील 30 टक्के बनावट सुरक्षा रक्षकांमधील 50 टक्के हिस्सा अमित चंडोळे घ्यायचा हा 50 टक्के हिस्सा प्रताप सरनाईकांना मिळायचा, असं टाॅप्स ग्रुपचे उपाध्यक्ष रमेश अय्यर यांना टाॅप्स ग्रुपचे मालक राहुल नंदा यांनी सांगितले होते. तर मुंबईतील सर्व उड्डाण पुलांवर सुरक्षारक्षक आणि ट्रॅफिक मार्शल पुरवण्याचे MMRDA चे कंत्राट टाॅप्स ग्रुपला मिळाले होते ज्याकरता महिना ३२ ते ३३ लाख रुपये MMRDA देणार होती. हे कंत्राट ५०-५० टक्के प्राॅफिट शेअरनुसार टाॅप्स ग्रुप आणि प्रताप सरनाईक यांच्यात ठरलं होतं. प्रताप सरनाईकांचा ५० टक्के शेअर टाॅप्स ग्रुपकडून प्रताप सरनाईक यांच्याकरता अमित चंडोळे रोख रकमेत स्विकारायचा. अमित चंडोलेला टाॅप्स ग्रुप दर महिना ६ लाख रुपये बिझनेस प्रमोशन करता देत असल्याची नोंद आधी करण्यात आली होती. ती नोंद नंतर अमित चंडोलेला दरमाह टाॅप्स ग्रुप कडून ६ लाख रुपये पगार म्हणून दाखवण्यात आली. उद्योगपती राहुल नंदा यांची आणि अमित चंडोळे ची भेट प्रताप सरनाईक यांनी घडवून आणली होती. MMRDA आणि टाॅप्स ग्रुपमध्ये जे व्यवहार व्हायचे त्या व्यवहारातील ५० टक्के रक्कम ही राहुल नंदा आणि प्रताप सरनाईक यांच्यात ठरलेल्या करारानुसार अटी शर्ती पलिकडे जाऊन दिली जायची. ती ही रक्कम रोख स्वरुपात किंवा इंटरनेट बॅंकिंग स्वरुपात दिली जायची. MMRDA चे सुरक्षा रक्षकांचे टेंडर निघण्यापूर्वी 50 टक्के नफा या टेंडर मधून प्रताप सरनाईकांना दिला जाईल असे सगळे व्यवहार तोंडी स्वरुपात एकमेकांशी झाली होते. पुन्हा होणार सर्वांची ईडी चौकशी? ईडीच्या तपासात सुरुवातीला टॉप्स सिक्युरीटीकडून एम शशीधरण हा पैसे वाटायचं काम करायचा तर इतरांच्या वतीने अमित चंडोले हा पैसे स्वीकारायचा, हे तपासात उघडकीस आलं. यामुळे अमित आणि शाशीधरण या दोघांना अटक झाली. ते अजूनही जेल मधेच आहेत. मात्र, या अटकेत असलेल्या दोन आरोपींच्या तपासात एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना कुणाला किती पैसे द्यायचे, याबाबत चर्चा व्हायची आणि त्याच्या संभाषणाची माहिती ईडीच्या अधिकाऱ्याना उपलब्ध झाली आहे. त्यामुळे येत्या काळात TOPS SECURITY घोटाळ्याशी संबंधीत सर्वांची पुन्हा ईडी चौकशी करणार असून लवकरच सर्वांना इडीने पुन्हा समन्स जारी करणार असल्याची माहिती इडी सुत्रांनी दिली.