मुंबई, 12 ऑक्टोबर : राज्यात कोरोनाने थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या परिस्थितीत कर्तव्य बजावत असताना मुंबई पोलीस दलातील सुरेखा महाडिक यांचं निधन झालं आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना वीरमरण आले आहे. सुरेखा महाडिक (सुरेखा प्रशांत उनावकर) या महिला अंमलदार म्हणून मुंबईत कार्यरत होत्या. सन 2001 साली मुंबई पोलीस दलात भरती झालेल्या पोलीस शिपाई सुरेखा महाडिक या विशेष शाखा - 2 (एसबी - 2) येथे कर्तव्याला होत्या. सध्या त्या मुंबई विमानतळ येथे कर्तव्य बजावत होत्या. गेल्या 8 दिवसांपूर्वी त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने सुरेखा महाडिक यांनी कोरोनाची चाचणी केली. कोविड-19 ची लागण झाल्याचे निष्पन्न होताच सुरेखा महाडिक यांना ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील वैद्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. अखेर उपचारादरम्यान 11 ऑक्टोबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 40 वर्षांच्या होत्या.
आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्वामुळे मुंबई पोलीस खात्यात त्यांची स्वत:ची विशेष ओळख होती. सुरेखा महाडिक यांचे निधन झाल्याची बातमी आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. सुरेखा महाडिक यांच्या रूपात एक कर्तव्य दक्ष सहकारी गमावल्याने पोलीस खात्यातील अनेकांनी शोक व्यक्त केला. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 लाखांवर दरम्यान, राज्यात रविवारी (11 ऑक्टोबर)पर्यंत 10,792 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांच संख्या ही 15,28,226 एवढी झाली आहे. तर 309 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा हा 40,349 एवढा झाला आहे. तर 10 हजार 461 जणांनी कोरोनावर मात केली.
संजय राऊत आणि कुणालच्या मुलाखतीची कंगनाने उडवली खिल्ली, स्वत: फोटो केला शेअर
मागील 4 आठवडयातील रुग्णसंख्येचे विश्लेषण केले असता दर आठवडयाला नव्याने आढळणारे बाधित रुग्ण कमी होताना दिसत आहेत. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडयात 1 लाख 53 हजार 331 एवढे नवे रुग्ण आढळले होते. त्यांची संख्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडयात 92 हजार 246 एवढी आहे. त्यामुळे रुग्ण संख्येत जवळपास 40 टक्के घट झाली आहे. 10 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या काळात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात 70.72 टक्क्यांवरुन 82.76 टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली आहे.