त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने मेट्रो कारशेड कांजूरमध्ये करण्याचा निर्णय, चुकीचा होता अशी चर्चा रंगू लागली आहे.
मुंबई, 12 जुलै : आरे जंगलात उभारण्यात येणाऱ्या मेट्रो कारशेडला (Metro project in Kanjurmarg ) महाविकास आघाडीने (mva government) विरोध दर्शवला होता आणि हा प्रकल्प कांजूरमार्ग इथं हलवण्यात आला होता. पण, कांजूरमार्गमध्ये हा प्रकल्प हलवणे हे वेळखाऊ आणि व्यवहार्य नाही, अशी माहिती आरटीआयमध्ये उघड झाल्याचा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. किरीट सोमय्यांनी आरे जंगलामध्ये मेट्रो कारशेड हलवण्याबद्दल माहितीच्या अधिकारातून माहिती मागवली होती. त्यांच्या या माहितीला एमएमआरडीएने उत्तर दिले आहे. ‘कांजूर कारशेड एकापेक्षा अधिक मेट्रोसाठी वापरणे व्यवहार्य नाही. असं उत्तर सोमय्यांच्या पत्रावर MMRDAने दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने मेट्रो कारशेड कांजूरमध्ये करण्याचा निर्णय, चुकीचा होता अशी चर्चा रंगू लागली आहे.
मेट्रो 3 आणि कारशेड आरेऐवजी कांजूरमार्गमध्ये व्हावं अशी भूमिका ठाकरे सरकारने घेतली होती. मात्र त्यानंतर केंद्र विरुद्ध राज्य सरकार वाद कोर्टात गेल्यानंतर, कांजूर कारशेडचं प्रकरण कोर्टात अडकून पडले आहे. शिंदे सरकार सत्तेवर येताच आरेमध्ये मेट्रोचे कारशेड होणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काय आहे प्रकरण? आरेची 800 एकर जागा जंगल घोषित करत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडचा प्रकल्प हा कांजूरमार्ग इथं हलवला. त्यानंतर कांजूरमार्गमध्ये कामाला सुरुवात देखील झाली. पण, आता केंद्र सरकारने कांजूरमार्गच्या जागेवर दावा केला. कांजूरमार्गमधील जागा ही मिठागराची असून त्यावरचा हक्का अद्याप सोडला नाही, त्यामुळे ही जागा एमएमआरडीएला देण्याचा निर्णय रद्द करा, असे पत्रच केंद्र सरकारने राज्याच्या सचिवांना पाठवले होते. त्याचबरोबर कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम त्वरीत थांबावा, असंही या पत्रात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणी राज्य सरकारने हायकोर्टात धाव घेतली. त्यानंतर, ‘कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने MMRDA ला दिले होते. कारशेडच्या जागेची स्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. आता उच्च न्यायालयाने नव्याने निर्देश दिले आहे.