मुंबई, 30 मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणून शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे (Shivsena) 39 आणि 11 अपक्ष असे एकूण 50 आमदारांसह बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्या या बंडानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली. एवढच नाही तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्वीट करून एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. पण शिवसेनेकडून मात्र अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, आता राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून राज यांनी एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देत एक इशारा दिला आहे. शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नेहमीच माध्यमांशी संवाद साधणारे संजय राऊतही (Sanjay Raut) शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या घोषणेनंतर अजून काही बोललेले नाहीत. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केलं तेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनीही भाजप तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहे का? असे सवाल उपस्थित करत होते. तसंच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होत असतील, तर आम्ही पाठिंबा देऊ, असंही शिवसेनेकडून बोललं गेलं होतं. आता शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे यांच्याकडूनही काहीच प्रतिक्रिया आली नाही.
स्वकीयांचा दगा, आमदारांची बंडखोरी.. ठाकरे कुटुंब अन् सेनेसमोर ‘ही’ आहेत आव्हानं
राज ठाकरे यांचा शिंदे यांना इशारा उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी खोचक टोला लगावला होता. आता मात्र, शिंदे यांनी शुभेच्छा देताना एक इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, की एकनाथ शिंदेजी, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन. खरंच मनापासून आनंद झाला. नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल ही आशा. आपण तरी बेसावघ राहू नका. सावधपणे पावले टाका. पुन्हा एकदा आपले अभिनंदन. दरम्यान, सावध कोणापासून राहा? हे मात्र काही स्पष्ट झालेलं नाही.
उद्धव ठाकरे यांना टोला राज यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय. एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तुत्व समजू लागतो त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो, अशी पहिली प्रतिक्रिया राज यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्यापूर्वीच त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडले.