मुंबई, 12 डिसेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे यूपीएचे अध्यक्ष होणार अशी राजकीय चर्चा रंगली आहे. ‘जर शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष झाले तर आम्हाला आनंदच आहे’, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) दिली. तसंच यूपीएला मजबूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे, असंही राऊत म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे जर यूपीएचे अध्यक्ष झाले तर ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पण, पवार यांनी स्पष्ट केले आहे की, या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नाही. याबाबत अजून कोणता प्रस्ताव आला नाही तर त्याबाबत बोलणे चुकीचं आहे’ असं संजय राऊत म्हणाले.
तसंच, ‘काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विरोधीपक्षही मिळवता आले नाही, हेही सत्य आहे. सध्या राजकारणाच्या परिस्थितीत सर्व विरोधी पक्षांना मजबुतीचे निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे विरोक्षी पक्षांनी एकत्र येऊन यूपीएला मजबूत केले पाहिजे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे. देशात एक मजबूत फ्रंट हवा आहे, याच नेतृत्व कोण करणार ही एक मोठी गोष्ट आहे, असं सूचक विधानही संजय राऊत यांनी केले. ‘माणूस हा जंगली जनावरापेक्षा हिंसक झाला आहे. पुण्यात रानगव्याच्या मागे इतकी लोकं लागले शेवटी तो मृत्यू पावला. जंगल खात्याच्या लोकांना प्रशिक्षण देण गरजेचं आहे. परंतु, विधान परिषद निवडणुकीत पुणेकरांनी आणि नागपूरकरांनी रानगव्यांना त्यांची जागा दाखवली आहे’ असं म्हणत राऊत यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला.