मुंबई, 29 ऑगस्ट : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी ‘ऑल इज वेल’ असं म्हणत आपल्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. तसंच नागरिकांना कोरोना टाळण्यासाठी काळजी घेण्याबाबत आवाहन केलं आहे. ‘मागील साडे पाच महिने कोरोनाशी लढत असताना 24 ऑगस्ट रोजी माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली. लक्षणे नसल्यामुळे मात्र पॉझिटिव्ह आल्याने शासनाच्या गाईडलाईन्सनुसार मी स्वतःला गृह विलगीकरणात ठेवले. या काळात गृह विलगीकरणाचे सर्व नियम मी पाळत आहे. मास्क लावणे, कुटुंबातील कुठलाही सदस्य मी असलेल्या खोलीत न येणे, व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स आणि झिंक गोळ्यांचे सेवन करणे, थर्मल स्कॅनिंग द्वारे ठराविक काळानंतर शरीराचे तापमान तपासणे आदी सर्व दिशानिर्देशांचे पालन करीत आहे,’ अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. नागरिकांना केलं आवाहन ‘ज्यांना-ज्यांना लक्षणे नाहीत मात्र ते पॉझिटिव्ह आले आहेत, अशा सर्वांनी गृह विलगीकरणाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे. आपणापासून इतरांना संक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी,’ असं आवाहन तुकाराम मुंढे यांनी केलं आहे. तसंच ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. या शुभेच्छासोबतच सर्व नियम पाळत विलगीकरणाचा काळ मी पूर्ण करेन, असा विश्वास देतो, असंही मुंढे म्हणाले. दरम्यान, ‘कोरोनाच्या संक्रमण काळात यंत्रणा प्रमुख म्हणून कार्य करताना अनेकांच्या संपर्कात आलो. काळजी म्हणून काही वेळा कोरोना चाचणी केली. मात्र काल केलेल्या चाचणीत ‘पॉझिटिव्ह’ आलो,’ असं म्हणत चार दिवसांपूर्वी तुकाराम मुंढे यांनी आपल्या कोरोना अहवालाबाबत माहिती दिली होती.