Mumbai: Mumbai Police Commissioner Sanjay Barve addresses Ulama Karam on the Citizenship Amendment Act issue in Mumbai, Wednesday, Dec. 25, 2019. (PTI Photo) (PTI12_25_2019_000108B)
मुंबई 25 डिसेंबर : NRC आणि CAA वरून सध्या देशभर वातावरण तापलंय. देशभर विरोध आणि समर्थनासाठी मोर्चे निघताहेत. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी देशभर मोदी सरकारच्या या निर्णयाला विरोध केलाय. हा विरोध करणाऱ्यांमध्ये मुस्लिम संघटना अग्रेसर आहेत. याच संदर्भात मुस्लिम धर्मगुरुंनी आज मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेऊन चर्चा केली. पोलीस आयुक्तांनी सर्व धर्मगुरू आणि मुस्लिम नेत्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं आणि त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली. या प्रकरणी काही समाजकंटक मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताहेत त्यांच्या खोट्या भुलथापंना बळी पडू नका असं आवाहनही त्यांनी केलं. पोलीस आयुक्त बर्वे म्हणाले, NRC विषयी अजुनही कुठलाही आदेश आलेला नाही किंवा काही माहितीही आलेली नाही. NRC आणि CAAमुळे कुणाचेही नागरिकत्व जाणार नाही. देशातल्या मुस्लिम किंवा कुठल्याही नागरिकाला घाबरण्याचं मुळीच काम नाही. काही लोक जाणीवपूर्वक भीती पसरविण्याचं काम करताहेत. ही कोण मंडळी आहे याची पोलिसांकडे माहिती आहे. गरज पडली तर ती माहिती जाहीर करण्यात येईल. काही संघटना आणि लोक विरोधासाठी रॅलीची परवानगी मागण्यासाठी आमच्याकडे येत आहेत.
ते कोण आहेत आणि त्यांचा उद्देश काय आहे याची पोलिसांना चांगली माहिती आहे. शुक्रवारच्या प्रार्थनेवेळी देशाच्या कल्याणाची आणि शांततेसाठी प्रार्थना करा असं आवाहनही त्यांनी सर्व धर्मगुरुंना केलं. बर्वे म्हणाले, माझा जन्म इथलाच असला तरी सध्या माझ्याकडे जन्माचं प्रमाणपत्र नाही. योग्य वेळी मी ते सिद्ध करणार आहे. जर मला घाबरण्याचं कारण नाही तर मुसलमानांनाही घाबरण्याचं कारण नाही असंही ते म्हणाले.