मुंबई, 7 जानेवारी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद नामांतराचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. काँग्रेसचा नामांतरला विरोध आहे, तर दुसरीकडे भाजपने नामांतराच्या मागणीला जोर धरला आहे. अनेक भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन मत व्यक्त करण्याचं आवाहन केलं होतं. काल मुख्यमंत्र्यांच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ट्विटरवरील एका पोस्टमध्ये औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला होता. यावरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा CMO Maharashtra या अधिकृत अकाऊंटवरुन मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला आहे. यामुळे येत्या काळात हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज CMO Maharashtra या अकाऊंटवरुन मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं आहे की, काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 31 डिसेंबर 2020 पर्यंत राज्यातील नियमित न झालेल्या गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. मी काही दिवसांपूर्वी संभाजीनगरवासीयांना याविषयी आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता केली आहे.
यानंतर काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. औरंगाबादच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पडणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.