मुंबई, 12 जुलै : शिवसेनेनं जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्यानंतर आमदार संतोष बांगर (shivsena mla santosh bangar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (cm eknath shinde) भेट घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी शिंदे यांनी बांगर हे जिल्हाध्यक्षपदी कायम राहणार अशी घोषणा करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशालाच चॅलेंज केलं आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यामुळे रडणारे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर अचानक शिंदे गटात सामिल झाल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एवढंच नाहीतर बहुमत चाचणीत बांगर यांनी शिंदे यांना मत दिले होते. त्यामुळे शिवसेनेनं बांगर यांची हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरून आमदार संतोष बांगर यांची हकालपट्टी केली होती.
शिवसेनेच्या कारवाईनंतर संतोष बांगर चांगलेच संतापले होते. त्यानंतर आज संतोष बांगर आपल्या कार्यकर्त्यांसोबत मुंबईत दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अग्रदूत बंगल्यावर पोहोचून बांगर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. एकनाथ शिंदे यांच्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री शिंदेंचा सत्कार केला. यावेळी, एकनाथ शिंदे यांनी सर्व कार्यकर्त्यांची समजूत काढली. मी मुख्यमंत्री झालो हा सर्व शिवसैनिकांसाठीचा निर्णय आहे. मी मुख्यमंत्री नाहीतर तुम्ही सर्व मुख्यमंत्री आहात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील शिवसेना सत्तेत आली आहे. संतोष बांगर यांना कुणीही पदावरून हटवू शकत नाही, ते जिल्हाध्यक्षपदी कायम असणार आहे, अशी घोषणाच शिंदे यांनी केली. दरम्यान, हिंगोलीतील शिवसेनेचे काही कार्यकर्ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवसेना भवन येथे दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सोबत आम्ही आहोत ही भूमिका मांडण्यासाठी आलेल्या हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिकांशी उद्धव ठाकरे आज संवाद साधणार असल्याची माहिती आहे.