कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण: एनसीबीकडून आर्यन खानला क्लीन चिट; समीर वानखेडेंनी प्रतिक्रिया देत म्हटलं...
मुंबई, 27 मे : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Cordelia Cruise drug party case) एनसीबीने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक केली होती. बॉलिवूड सुपरस्टारच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्याने या प्रकरणाची संपूर्ण देशभर चर्चा झाली. त्याच प्रकरणात आता एनसीबीने आर्यन खानला क्लीन चिट दिली आहे. आर्यन खानला क्लिन चिट देण्यात आल्याने आता त्यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. कॉर्डेलिया क्रूझवर धाड टाकत कारवाई केलेल्या मुंबई एनसीबीचे (NCB) तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे. आर्यन खानला क्लीन चिट देण्यात आल्यानंतर सीएनएनने समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर समीर वानखेडे यांनी म्हटलं, “मी या प्रकरणाशी आता संबंधित नाहीये आणि यावर भाष्य करू इच्छित नाही”.
हायप्रोफाईल अशा कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने आर्यन खान याला क्लीन चिट दिली आहे. आर्यन खानकडे अंमली पदार्थ सापडले नसल्याचे एनसीबीने स्पष्ट केले आहे. आर्यन खानसह एकूण 6 जणांना एनसीबीकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. वाचा : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण; आर्यनकडे ड्रग्ज होते की नाही? NCBने केला मोठा खुलासा पुराव्यांअभावी साह जणांना क्लीन चिट देण्यात आली आहे तर इतर 14 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एनसीबीने विशेष न्यायालयात आपले अंतिम आरोपपत्र दाखल केले आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस कोर्टाने एसआयटीला आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुद्दतवाढ दिलेली. हे आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुदतवाढ 29 मे रोजी संपुष्टात येणार होती आणि त्यापूर्वी एनसीबीने आता आरोपपत्र दाखल केले आहे. काय आहे प्रकरण? 2 ऑक्टोबर रोजी क्रूझवर एनसीबीने कारवाई करत ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर 26 दिवसांनी आर्यन खान (Aryan Khan) याला जामीन मिळाल्यावर आर्थर रोड कारागृहातून (Arthur Road Jail) सुटका झाली. मुंबई हायकोर्टाने आर्यन खानला अटी शर्तीसह जामीन मंजूर केला होता.