मुंबई, 25 एप्रिल : मुंबई महानगरामध्ये (Coronavirus Cases in Mumbai) आत्तापर्यंत सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. शहर परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असून काही ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नाहीत, अशी स्थिती आहे. यामध्ये बेडबाबत महापालिकेने (BMC) केलेल्या ट्विटवर काहींनी टीका केली आहे. वॉर्ड वॉर रूमलाच बेड देण्याचा अधिकार आहे, नागरिकांनी व्यवस्थेचे पालन करावे, अशा आशयाचे एक ट्वीट पालिकेकडून करण्यात आल्यानंतर काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) यांनी त्यावर टीका केली.
लोकांनी सोशल मीडियावरून किंवा एखाद्या अधिकाऱ्याला थेट फोन करून ओळखीने बेड मागण्याचा प्रयत्न करू नये. सर्वांनी बेड मिळवण्यासाठी निर्माण केलेल्या व्यवस्थेचे पालन करावे, असे ट्वीट पालिकेने केल्यानंतर त्यावर काहींनी टीका केली. हा महापालिका प्रशासनाचा हेकेखोरपणा आहे, लोकांना बेड मिळत नसल्यामुळेच ते सामाजिक कार्यकर्ते, नेत्यांची मदत घेत आहेत. या बिकट काळात सर्वांनी एकत्र येवून सामान्य माणसाला मदत मिळवून दिली पाहिजे, असे सिद्दीकी यांनी ट्विट करून म्हटले आहे.
काही लोक, समाजसेवी संस्था लोकांना बेड मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांची मदत करत आहेत, अशा लोकांचे आम्ही कौतुकच करतो. मात्र, सर्वांनी बेड मिळवण्यासाठी ठरवून दिलेल्या व्यवस्थेचे पालन करणे गरजेचे आहे. बेड देण्याचा अधिकार वॉर्ड वॉर रूमलाच आहे. त्यामुळे बाहेरून कुणाशी संपर्क साधण्याऐवजी लोकांनी वॉर्ड रूमशी संपर्क करावा, अशी विनंती पालिकेकडून करण्यात आली आहे. (हे वाचा- ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्यानं कोविड रुग्णालयाला भीषण आग, 15 जणांचा होरपळून मृत्यू ) दरम्यान, मुंबईत शनिवारी कोरोना रुग्ण संख्येत किंचितसा दिलासा मिळाला असून 5 हजार 888 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 22 हजार 109 वर पोहोचला आहे. शनिवारी 71 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 12 हजार 719 वर पोहोचला आहे. तर 8 हजार 549 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 5 लाख 29 हजार 233 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 78 हजार 775 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 54 दिवस इतका आहे.