JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / राज्यात अपघातांची मालिका सुरुच, मुंबईत बेस्ट बसचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

राज्यात अपघातांची मालिका सुरुच, मुंबईत बेस्ट बसचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

बेस्ट बसची भीषण अपघात झाला.

जाहिरात

फाईल फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 जुलै : बुलडाण्यातल्या खासगी बसच्या अपघाताची घटना ताजी असतानाच मुंबईमध्येही एक अपघात झाला आहे. गोरेगाव पूर्व येथे रविवारी मध्यरात्री बेस्टची बस घसरून झालेल्या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला. हे दोघंही जण वाहनातून बाहेर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, एवढा हा अपघात भीषण होता. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. जॉनी संखराम (42 वर्षं) आणि सुजाता पंचकी (38 वर्षं) अशी मृतांची नावं आहेत. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळील गोरेगाव चेक नाका पुलावर रविवारी (2 जुलै) मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आरे सब-पोलीस स्टेशननं दिलेल्या माहितीनुसार, बेस्टची बस क्रमांक 1453 (एमएच 01एपी 0226) बस क्रमांक 1862च्या (एमएच 01 एपी 0746) पाठीमागे होती. या दोन्ही बस डेपो हस्तांतरणासाठी पोईसर डेपोतून घाटकोपर डेपोकडे जात होत्या. घटना घडली तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता. निसरड्या रस्त्यावर बसवर नियंत्रण ठेवण्यासाठी बस क्रमांक 1862चा चालक संतोष शंकर घोणगे (45 वर्षं) याने ब्रेक लावला. परिणामी, पाठीमागे असलेल्या बस क्रमांक 1453चा चालक संतोष विष्णू देवळेकर यालाही अचानक ब्रेक लावावा लागला. त्यामुळे दुसरी बस निसरड्या रस्त्यावरून घसरून अगोदर समोरच्या बसला धडकली आणि नंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऑटो रिक्षाला (एमएच 02 ईक्यू 9371) धडकली. बस रिक्षाला आदळल्यानंतर रिक्षातल्या दोन्ही प्रवाशांची डोकी लोखंडी सळ्यांवर आपटली आणि ते दोघंही जण रिक्षातून बाहेर फेकले गेले. रिक्षाचा चालकही जखमी झाला. बेस्ट बसच्या चालकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी संखराम यांना जोगेश्वरीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेलं. तिथे प्राथमिक तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. पंचकी हिला अंधेरीतल्या कोकिलाबेन रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पहाटे पावणेतीन वाजता तिचा तिथेच मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मृत व्यक्ती एकमेकांच्या नातेवाईक होत्या. एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर रात्री गोरेगावच्या दिशेने जात असताना त्यांचा अपघात झाला. वनराई पोलिसांनी बस क्रमांक 1453च्या चालकावर भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (अ) नुसार निष्काळजीपणामुळे मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं, की रस्ता निसरडा असल्याने चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं. वनराई पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, चालक देवळेकरला रविवारी अटक करण्यात आली असून, त्याला सोमवारी (3 जुलै) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या