मुंबई, 28 जुलै: काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh)यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा (Case Of extortion Registered) दाखल करण्यात आला होता. दरम्यान आता परमबीर सिंह यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) एसआयटीची (SIT) नेमणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. परमबीर सिंह आणि इतर 5 पोलीस अधिकाऱ्यांवर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एसआयटीची नेमणूक केली आहे. मरीन ड्राईव्ह येथे परमबीर सिंह आणि पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांविरुद्ध 15 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी भाईंदर येथील बिल्डर श्यामसुंदर अग्रवाल यांनी गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार श्यामसुंदर अग्रवाल यांच्या विरोधात जुहू पोलीस स्टेशनमध्ये मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास देखील याच एसआयटीद्वारे करण्यात येणार आहे. परमबीर सिंह यांच्या विरोधात एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. मुंबईत एक तर ठाण्यामध्ये दोन असे गुन्हे दाखल करण्यात आलेत. कोरोनावर भारी पडतोय Natto; व्हायरसशी लढणारा सुपर ब्रेकफास्ट मरीन ड्राईव्ह येथे नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यातील तक्रारदार श्यामसुंदर अग्रवाल यांचा अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील याच्याशी संबंधी असल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या एसआयटी प्रमुख पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी असेल. सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी या तपासाचा तपास अधिकारी म्हणून काम करेल. तसंच या एसआयटीमध्ये पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक आणि सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.